ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. आकाशात प्रवास करत असलेलं हे विमान अचानकपणे जमिनीवर कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे एक प्रवासी वाहतूक विमान होत. या विमानात एकूण 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत वैमानिकासह 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून जमिनीवर कोसळल्यानंतर या विमानाचा स्फोट झाल्याचं या व्हिडीओंमध्ये दिसत आहे.
नेमकं काय घडलं? (Brazil Airplan Crash)
मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त विमान ब्राझीलमधीलच साओ पौलो येथील गुआरुलहोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं. या विमानात एकूण 58 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. दुर्घटनाग्रस्त विमानाचे नाव एटीआर-27 असून ते व्होपास लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सचे होते. या विमानाची प्रवासी क्षमता 68 होती. मिळालेल्या माहितीनुसार नागरी वस्तीत हे विमान क्रॅश झाले असून जमिनीवर येताना ते अनेक घरांना धडकले. त्यामुळे या दुर्घटनेत आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. सध्यातरी नागरी विस्तीतील जीवितहानीबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची सात पथके
साओ पौलो येथील अग्निशामक दलाने या घटनेची पुष्टी केली आहे. या दुर्घटनेची माहिती होताच अग्निशामक दलाने दुर्घटनास्थळी एकूण 7 पथके पाठवली आहेत. व्होपास एअरलाइन्सनेही या अपघातानंतर अधिकृत माहिती दिली आहे. साओ पौलो येथील गुआरुलहोस येथील विमानतळावर उतरणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. या विमानात चार क्रू मेंबर्स आणि अन्य 58 प्रवासी होते, असे या एअरलाईन्सने सांगितलंय.
पाहा विमान अपघाताच व्हिडीओ (Brazil Airplane Crash Video)
दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण जगात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान अपघाताचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्होपास लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सेही या अपघाताबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या दुर्घटनेनंतर ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मानवी चुकांमुळे हे विमान कोसळल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा :