फ्रँकफर्ट : काहीशे पाकिस्तानी समर्थकांची रॅली आणि त्यांना उत्तर देणारा एकमेव मराठमोळा मावळा. हे चित्र होतं जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातील. एवढ्या पाकिस्तानी नागरिकांसमोर ताठ मानेने, हिंमतीने उभा राहिलेल्या या मराठमोळ्या भारतीयाचं नाव आहे प्रशांत वेंगुर्लेकर. भारताच्या स्वातंत्र्यदिनी फ्रँकफर्टमध्ये रॅली काढून भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध घोषणाबाजी देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारताचा तिरंगा फडकावत प्रशांत वेंगुर्लेकर यांनी चोख उत्तर दिलं. यावेळी पाकिस्तानी नागरिकांच्या रोषाला ते जुमानले नाहीत. त्यांनी आपला संयम सोडला नाही, जागा सोडली नाही की तिरंगा फडकावणंही सोडलं नाही. एवढ्या मोठ्या रॅलीविरुद्ध केवळ एका भारतीयाला पाहून मोर्चेकरीही काही वेळ स्तब्ध झाले होते.
फ्रँकफर्टमध्ये नेमकं काय घडलं?
15 ऑगस्ट, भारताच्या स्वातंत्र्यदिनी काही पाकिस्तानी समर्थक जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये जमा होऊन भारत तसंच पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत होते. 'आझाद काश्मीर' आणि 'खलिस्तान'ला पाठिंबा देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानी नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याशिवाय खलिस्तान आणि पाकिस्तान समर्थनाच्या घोषणाही बॅकग्राऊंडला ऐकू येत आहेत.
यावेळी एवढ्या मोठ्या रॅलीविरोधात एकटा मराठमोळा भारतीय देशाच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. प्रशांत वेंगुर्लेकर यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून तो जबरदस्त शेअर होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "काही पाकिस्तानी नागरिक फ्रँकफर्कमध्ये रॅली काढून आपल्या महान देशाविरोधात आणि पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत होते. मी एकट्याने त्यांचा विरोध केला आणि पाकिस्तानी नागरिकांनी विरोध करुनही मी जागेवरुन हटलो नाही. जय हिंद." या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि काही मीडियाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं होतं.
प्रशांत वेंगुर्लेकर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि हिंमतीमुळे काही पाकिस्तानी नागरिक त्यांच्या अंगावर धावून आले, तरीही त्यांनी तिरंगा फडकावत घाबरत नसल्याचं सांगितलं.
अभिनेता रितेश देशमुखने प्रशांत वेंगुर्लेकर यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन 'प्रशांत तुझा अभिमान आहे, जय हिंद, असं कॅप्शनही दिलं. प्रशांत वेंगुर्लेकर यांच्या या ट्वीटला जवळपास 15 हजारांपेक्षा जास्त रिट्वीट आणि 39 हजार लाईक्स मिळाले आहेत. सगळ्यांनी प्रशांत वेंगुर्लेकर यांच्या दाखवलेल्या देशप्रेमाचा, मराठी बाण्याचं कौतुक केलं आहे.
प्रशांत वेंगुर्लेकर हे सिव्हिल इंजिनिअर असून ते सध्या जर्मनीत काम करतात.