इस्लामाबाद : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी संशय व्यक्त केला आहे. महमूद म्हणाले की, "मला खात्री नाही की, या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असेल. जैश...च्या अनेक मोठ्या कमांडर्सनी याबाबत हात वर केले आहेत. जैशने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही."


पाकिस्तान एकीकडे शांततेसाठी चर्चा करु असा प्रस्ताव ठेवत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजूनही दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहे. जैश...नेदेखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणतात की, मला खात्री नाही की, या हल्ल्यामागे जैशचा हात असेल.

बीबीसी या वृत्तवाहिनीला मेहमूद कुरैशी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत कुरैशी यांनी कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुरैशी यांना पत्रकारांनी सांगितले की, "पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे." तरीदेखील कुरैशी यांनी हे मान्य केले नाही. उलट ते म्हणाले की, "पुलवामा हल्ल्याबाबत आमच्या काही जवळच्या लेकांनी जैश-ए-मोहम्मदच्या काही कमांडर्सची चर्चा केली. तेव्हा त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला." कुरैशी यांना विचारण्यात आले की जैशच्या संपर्कात असणारे तुमचे निकटवर्तीय कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देण्यास कुरैशी यांनी नकार दिला.