इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं, पण या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरगडच्या दौलत पौर परिसरात ही घटना घडली आहे. आसिया असं या महिलेचं नाव असून दोन महिन्यांपूर्वी तिचं लग्न जबरदस्तीने केलं होतं.

लग्नापूर्वी घरातून पळून जाण्याचा आसियाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर लग्न झाल्यावर पतीला मारण्यासाठी तिच्या प्रियकराने तिला विष आणून दिलं होतं, अशी माहिती मुजफ्फरगड पोलिसांनी दिली.

पती अमजदला मारण्यासाठी तिने दुधात विष मिसळलं. महिलेने पतीला दूध पिण्यास सांगितलं, पण काही कारणाने तो दूध प्यायला नाही.

ज्या दुधात विष मिसळलं होतं, त्याची लस्सी बनवण्यात आली. महिलेच्या सासरची मंडळी ही लस्सी प्यायले. पण या लस्सीमुळे कुटुंबातील 27 जणांना विषबाधा झाली. त्यापैकी 13 जणांचा मृ्त्यू झाला, तर 14 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सुरुवातीला, दुधात पाल पडल्याने ते विषारी झालं, अशी सगळ्यांची धारणा झाली होती. पण आसियाने दुधात विष मिसळल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसियाच्या कथित प्रियकराला अटक करण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापा टाकत आहेत.