Operation Sindoor: भारतीय वायुदलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान पाकिस्तानला मोठा झटका दिला होता. या कारवाईत पाकिस्तान सैन्याच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये इस्लामाबादजवळ असलेला नूरखान एअरबेस देखील समाविष्ट होता. एनडीटीवीच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकार आता या उद्ध्वस्त झालेल्या तळाची दुरुस्ती करण्याच्या कामात गुंतले आहे.

मॅक्सार टेक्नॉलॉजीचे फोटो

मॅक्सार टेक्नॉलॉजीने नूरखान एअरबेसचे नवे फोटो जारी केले असून त्यामध्ये पाकिस्तान सरकार या बेसला पुन्हा उभारण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा तळ रणनीतिक दृष्ट्या पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तो इस्लामाबादपासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे.

ऑपरेशन सिंदूरमधील विध्वंस

मे महिन्यात झालेल्या या मोहिमेदरम्यान नूरखान एअरबेसवर मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. रनवेवर मोठमोठे खड्डे पडले होते, तर कॅम्पसचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता. तिथे ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि काही विमानं देखील नष्ट झाली होती. भारतीय वायुदलाने येथे मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले होते. मात्र कोणत्या मिसाइलचा वापर करण्यात आला, याबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती.

रिपोर्टनुसार, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाच्या सुखोई-३० विमानांवरून ब्रह्मोस मिसाइल डागण्यात आले, तर राफेल विमानांवरून स्कॅल्प मिसाइल प्रक्षेपित करण्यात आले होते. या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सैन्याला मोठे नुकसान झाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला

हे ऑपरेशन भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल सुरू केले होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेली किमान नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सैन्याने भारतातील काही शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय वायुदलाच्या सजगतेमुळे त्यांचे सर्व प्रयत्न फसले. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड धास्ती पसरली होती. भारतीय वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या महत्त्वाच्या सैनिकी ठिकाणांचे नुकसान झाले. नूरखान एअरबेसची सध्या दुरुस्ती सुरू असली, तरी या कारवाईने भारताने पुन्हा एकदा आपली लष्करी ताकद जगासमोर सिद्ध केली आहे.