कराची : पाकिस्तानात पुन्हा एकदा समाजकंटकांकडून मंदिर टार्गेट केलं गेलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान येथील गणपती मंदिरात तोडफोडीच्या घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पाकिस्तान पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेचा भारत सरकारने तीव्र शब्दात निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्ताच्या प्रभारींना बोलावले. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंदिरात तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आहे.
इम्रान खान यांनी म्हटलं की, "रहीम यार खानच्या भोंग येथील गणेश मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मी आधीच आयजी पंजाबला सर्व दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांच्या कोणत्याही निष्काळजीपणावर देखील कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तान सरकार मंदिराचा जीर्णोद्धार करेल.
इम्रान खान यांच्या ट्वीटपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारत गंभीर चिंता व्यक्त करत आहे.
बागची यांनी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले, "पाकिस्तानी उच्चायुक्ताच्या प्रभारींना आज दुपारी बोलावण्यात आले होते. पाकिस्तानमधील या निंदनीय घटनेवर आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर सातत्याने होणारे हल्ले यावर गंभीर चिंता व्यक्त करत तीव्र निषेध करण्यात आला.
पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला केला. रहिम यार खानचे जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) असद सरफराज म्हणाले, "हल्लेखोरांनी काठ्या, दगड आणि विटांना हल्ला केला. त्यांनी धार्मिक घोषणा देताना देवी -देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंदिराचा एक भागही जाळला गेला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.