तापमानवाढीसारख्या गंभीर समस्येवर जगभर चर्चा होत असताना पाकिस्तानने मात्र आपल्या कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिमेकडे असणाऱ्या ‘खैबर पख्तूनख्वा’ या प्रांतात विविध प्रजातींची कोट्यवधी झाडे लावण्यात आली.
पाकिस्तानच्या ‘खैबर पख्तूनख्वा’ प्रांतात माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षाची सत्ता आहे. इम्रान यांच्याच पुढाकाराने 2014 साली या वृक्षलागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती.
‘खैबर पख्तूनख्वा’ या प्रदेशात भूस्खलनाच्या तसेच पुराच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावरच उपाय म्हणून ही मोहीम राबवली गेली. या प्रकल्पाद्वारे 42 पेक्षा जास्त प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. वन्यजीव रक्षण आणि वाढ यांच्यासाठी ही वृक्षसंपदा महत्त्वाची ठरणार आहे.
संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानातील जंगलक्षेत्र 12 टक्के असावं, असं सुचवलं होतं. मात्र सध्याच्या घडीला ते केवळ 5.2 टक्के एवढंच आहे. यामुळेच तापमान नियंत्रणासाठी झाडे लावणे ही तेथील गरजच बनली आहे. या पार्श्वभूमीवर ‘खैबर पख्तूनख्वा’ प्रांतातील ही मोहीम महत्वाची आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही’ या मोहीमची माहिती देणारा एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला आहे.