जन्मापासून भारताला जखमी करायची एकही संधी ज्या देशातील आर्मीने आणि नेत्यांनी सोडली नाही तो देश निरागसपणाचा आव आणून विचारतोय, आम्हाला काय मिळणार?
दहशतवाद हेच ज्या देशाचं प्रमुख आयात-निर्यात धोरण राहिलंय त्या देशाचा पंतप्रधान अजाणतेपणाचं ढोंग घेऊन आज विचारतोय , आम्हाला काय मिळणार?
जिथे दाऊद इब्राहिम, मसूद अजहर, हाफिज सईद सारखे अतिरेकी पोसले जातात तो देश आज विचारतोय, आम्हाला काय मिळणार?
जन्मापासून कधी अमेरिकेचा तर कधी चीनचा हस्तक म्हणून जगणारा देश आज विचारतोय, आम्हाला काय मिळणार?
एकतर इम्रान खान यांनी इतिहास नीट वाचला नसेल किंवा त्यांचं ज्ञान भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांपुरतं मर्यादित असेल.
त्यांच्यासाठी छोटीशी उजळणी... तुम्ही म्हणताय, पाकिस्तानला काय मिळणार?
1947 पासून भारत द्वेष करुन पाकिस्तानला काय मिळालं इम्रान साहब... तेच
तालिबानला जन्म देऊन पोसून काय मिळालं इम्रान साहब? तेच
1988 पासून काश्मीरचं नंदनवन उजाड करुन काय मिळालं... तेच
जागतिक दहशतवादाचा Evil Axis बनून काय मिळालं? तेच
ओसामा बिन लादेनला घरात लपवून काय मिळालं? तेच
1992 ला मुंबईत बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पाठवून जे मिळालं... तेच
गेली तीन दशकं भारताचा दुश्मन दाऊद इब्राहिमला आश्रय देऊन मिळालं...तेच
एकीकडे शांततेची कबुतरं उडवून लगेच कारगील युद्ध करुन मिळालं.. तेच
26/11 मुंबई हल्ल्याच्या रेकीसाठी डेव्हिड हेडलीला पाठवून मिळालं.. तेच
10 अशिक्षित अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन मुंबई हल्ला करुन मिळालं.. तेच
फाळणीसारखी भळभळती जखम देऊन जन्माला आलेल्या या देशाचा खोटारडेपणा फक्त भारतानेच नाही तर साऱ्या जगाने अनुभवला आहे. त्यामुळेच इम्रान साहब पाकिस्तानला काय मिळणार, हा प्रश्न तुम्ही खरं तर पाकिस्तान आर्मीला, आयएसआयला, तिथल्या जिहादी अतिरेकी संघटनांना विचारलं असतात तर बरं झालं असतं?
पाहा व्हिडीओ