Pakistan Out Of FATF Grey List : दहशतवाद्यांना पैसा पुरवणे आणि इतर प्रकारची मदत करणाऱ्यांवर करडी नजर ठेवणाऱ्या आर्थिक कृती टास्क फोर्स (FATF ) ने पाकिस्तानला मोठा दिलासा दिला आहे. तब्बल चार वर्षानंतर एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्ट वगळलं आहे. शुक्रवारी एफएटीएफच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एफएटीएफच्या या निर्णायामुळे आता पाकिस्तान आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विदेशातून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकतो. दरम्यान, एफटीएफने पाकिस्तानसोबत निकारगुआलाही ग्रे लिस्टमधून वगळले आहे. तर  कॉल फॉर एक्शनच्या काळ्या यादीत मॅनमारला टाकले आहे. 


FATF ने आपल्या निवेदनात म्हटलेय,  पाकिस्तान आता FATF च्या निगरानी प्रक्रियेत राहणार नाही.  ते आता आपल्या AML/CFT प्रणालीला आणखी मजबूत करण्यासाठी APG सोबत (अशिया/पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग) काम करु शकतात." पाकिस्तानने आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ठोस पावले उचलली आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत अथवा इतर मदत यावर नियंत्रण मिळवलं आहे. त्याशिवाय पाकिस्तान दहशतवाद्यांना मिळणाऱ्या निधीशी लढा देत आहे. तसेच या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी त्यांनी दूर केल्या आहेत. 






2018 पासून पाकिस्तान होता ग्रे लिस्टमध्ये 


मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी फंडिंग रोखण्यात अयशस्वी झाल्यामुळे 2018 पासून पाकिस्तान पॅरिस-आधारित 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या 'ग्रे' यादीत होता. ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा कृती आराखडा देण्यात आला होता. परंतु, FATF च्या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं हतं.  'ग्रे' यादीत राहिल्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक  आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळणे कठीण झालं होतं. पण आता ग्रे लिस्टमधून वगळल्यानंतर पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु शकतो. 


फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) काय करते? 


1989 साली स्थापन झालेली ही आंतर-देशीय संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्याचे फण्डिग, मनी लॉंड्रिं ग आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या घडामोडींवर नजर आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करते. सध्या या संघटनेचे युरोपियन युनियन आणि गल्फ कौन्सिल कोऑपरेशन (GCC) या संघटनांसह 39 सभासद आहेत. युनो आणि इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने याचे कार्य चालते. या संघटनेचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे.