Pakistan Flood : पाकिस्तान (Pakistan) महापुरानं वेढा घातला आहे. पाकिस्तान सध्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण पुराचा (Flood in Pakistan) सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे आतापर्यंत लहान मुलांसह 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. महापुरामध्ये माणसांसह शेकडो जनावरांनीही आपला जीव गमावला आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानला महापुरामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला 4 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झालं आहे. 


पाकिस्तानच्या महापुराचा जनजीवनासह अर्थव्यवस्थेवरही फार वाईट परिणाम होताना दिसत आहे. पाकिस्तानी सरकारकडून पुरामध्ये बचावकार्यासाठी लष्कराला पाचरण करण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. देशाचा 70 टक्के भाग पुराच्या विळख्यात आहे. या भीषण पुरामुळे पाकिस्तानात तीन कोटी लोक बेघर झाले आहेत.


भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या.


1.  मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) लागू केली आहे.


2. पाकिस्तानमधील मीडियाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिंध प्रांतावर झाला आहे. 


3. पाऊस आणि महापुरामुळे चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला 4 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झालं आहे. हे नुकसान अजूनही वाढू शकतं.


4. महापुरामुळे पाकिस्तानचं एकूण नुकसान सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.


5. पाकिस्तानमध्ये पाऊस आणि पुरामुळे कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. कापसाची पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत.


6. पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, देशाला कापड निर्यात करावी लागू शकते. यामध्ये एक अब्ज डॉलर्सचं नुकसानही सहन करावं लागू शकतं.


7. देशातील परिस्थिती पाहता पाकिस्तानला 2.6 अब्ज डॉलर किमतीचा कापूस आणि 90 दशलक्ष डॉलर किमतीचा गहू आयात करावा लागण्याची शक्यता आहे.


8. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये महापुरामध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे पाच लाख जनावरंही दगावली आहेत.


9. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बहुतेक भाग पुराच्या पाण्यानं वेढला आहे.


10. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 343 मुलांचा समावेश आहे.