Pakistan Mosque Blast : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये (Peshawar Blast) झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 28 जणांना प्राण गमवावे लागले. तर, 140 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पेशावरमधील मशिदीत एका आत्मघाती हल्लेखोराने हा दहशतवादी हल्ला (Terror Attack) केला. या आत्मघाती हल्ल्यात मशिदीचा एक भाग उद्धवस्त झाला. हा हल्लेखोर नमाज पठणाच्या पहिल्याच रांगेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
पेशावरमधील या मशिदीत दुपारच्या नमाज पठाणाच्या वेळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. या आत्मघाती हल्ल्यात शेकडोजण जखमी झाले. तर, अनेक मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत होते. या बॉम्बस्फोटानंतर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये आत्मघाती हल्ल्यानंतर लोकांमध्ये पसरलेली दहशत, जीवाच्या आकातांने फिरणारे लोक दिसत आहेत.
नमाज पठाणाच्या पहिल्याच रांगेत होता हल्लेखोर
पोलिस लाईन परिसरात असलेल्या मशिदीमध्ये दुपारी 1.40 वाजता दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आत्मघाती हल्लेखोर हा नमाजासाठी पहिल्या रांगेत उभा होता. नमाजच्या वेळी त्याने स्वत:ला उडवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेशावरचे शहर पोलीस अधिकारी मोहम्मद एजाज यांनी सांगितले की, मृतांचा नेमका आकडा अजून सांगता येणार नाही. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. त्याशिवाय, रुग्णालयातही काहींना नेण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांस पोलिसांचा समावेश असल्याचे पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले.
ही दृष्ये तुम्हाला विचलित करू शकतात.
राजधानी इस्लामाबादमध्ये हाय अलर्ट
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये या आत्मघातकी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.शहरातील सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती इस्लामाबाद पोलिसांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटले?
'डॉन' या वृत्तपत्राशी बोलताना, स्फोटातून थोडक्यात बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो दुपारच्या नमाजासाठी मशिदीत गेला होता. अचानक स्फोट झाला आणि काही समजण्यापूर्वीच तो मशिदीजवळील रस्त्यावर पडला. तो म्हणाला, 'मी इतका जोरात पडलो की माझे कान सुन्न पडले आणि मी बेशुद्ध झालो.'
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका जोरदार होता की मशिदीच्या शेजारील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
मागच्या वर्षीही पेशावरमध्ये अशीच मोठी घटना घडली होती. कोचा रिसालदार भागात शिया मशिदीत झालेल्या आत्मघातकी स्फोटात 63 लोक ठार झाले होते.
इतर संबंधित बातमी: