कुलभूषण जाधवांची पाक लष्करप्रमुखांकडे दया याचिका, पाकचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2017 11:40 PM (IST)
NEXT PREV
कराची : हेरगिरीच्या आरोपातून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्ताननं नवा कांगावा रचला आहे. कुलभूषण यांनी हेरगिरी केल्याची कबुली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. जाधव यांनी पाकचे लष्करप्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे केलेला दयेचा अर्ज पाकनं ट्विटरवर शेअर केला आहे. लष्करप्रमुखांनी दयेचा अर्ज फेटाळल्यास जाधवांकडे पाकच्या राष्ट्रपतींकडे याचिका करण्याचा पर्याय असेल, असं म्हटलं जातं. त्याशिवाय त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. दहा मिनिटांचा हा व्हिडिओ एप्रिल 2017 मध्ये शूट केल्याची माहिती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देण्यात आली आहे. 2005 आणि 2006 मध्ये आपण कराचीचा दौरा केल्याचे जाधव सांगत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओत 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांना भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं जाधव सांगताना दाखवलं आहे. https://twitter.com/OfficialDGISPR/status/877878876025892864 https://twitter.com/OfficialDGISPR/status/877879812563640320 पाकला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दणका मे महिन्यात आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीत भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. “महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये”, असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठणकावून सांगितलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला होता. व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. “कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांना मान्य आहे. मात्र ते हेर असल्याचे ठोस पुरावे नाहीत. पाकिस्तानच्या पुराव्यांवरुन कुलभूषण जाधव हे हेर किंवा स्पाय असल्याचं सिद्ध होत नाही. तसंच हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही, हे पाकचं म्हणणं चुकीचं असून, थेट फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही”, असं कोर्ट म्हणालं.