Karachi Police Head Quarter Attack :  पाकिस्तानातील कराची येथील पोलिस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पाकिस्तानी माद्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यालयात 10 हून अधिक दहशतवादी आहेत. यासोबतच एका उंच इमारतीतही दहशतवादी घुसले आहेत. कराची पोलिस कार्यालयातील सर्व दिवे बंद करण्यात आले आहेत. सर्व दरवाजेही बंद करण्यात आले असून हे ऑपरेशन अजून सुरू आहे. 


हल्लेखोरांनी पोलिस मुख्यालयाच्या मागून ग्रेनेड फेकले आणि नंतर त्यांनी चार मजली इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी स्फोट केला आणि गोळीबार केला तेव्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस मुख्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त दाखल झाला आहे. 


Karachi Police Head Quarter Attack :   10 हून अधिक हल्लेखोर विविध गटांमध्ये विभागले  


दहशतवादी आल्यानंतर पोलिस ठाण्याच्या प्रमुखांच्या कार्यालयातील दिवे बंद करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांची संख्या आणि त्यांचा ठावठिकाणाबाबतची माहिती घेत आहोत. प्राथमिक वृत्तानुसार दहशतवादी दुसऱ्या प्रवेशद्वारातून इमारतीत घुसले. त्याच वेळी, दहशतवाद्यांनी घेरलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सहकारी अधिकाऱ्यांना संदेश पाठवला की पोलिस प्रमुख कार्यालयात 10 हून अधिक हल्लेखोर गटांमध्ये विभागले गेले आहेत. हल्लेखोर कराची पोलिस कार्यालयाच्या मागील बाजूने घातक शस्त्रांच्या आधारे पोलिस पथकावर गोळीबार करत आहेत. दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी बसून ग्रेनेड फेकत होते, आतून गोळीबार करत होते. यापूर्वीही दहशतवाद्यांनी मियांवली पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. 


पोलिस मुख्यालयाला पोलिस आणि रेंजर्सच्या मोठ्या ताफ्याने वेढा घातला आहे. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात एक बचाव कर्मचारी जखमी झाला असून दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. बचाव कार्यकर्त्याला कराची येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी बचाव कर्मचाऱ्याचे नाव  साजिद असून तो ईधी स्वयंसेवक आहे. साजिदला दोन गोळ्या लागल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी कराचीच्या जिना हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कराची पोलुस प्रमुखांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची दखल घेतली ईग्.  मुराद अली शाह यांनी उपमहानिरीक्षकांना (डीआयजी) केओपीमध्ये पथके पाठवून हल्लेखोरांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. कराची पोलिस मुख्यालयावर सुरू असलेल्या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराची शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.