Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता  रशियामधील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी अडवले, तर पाकिस्तान केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अण्वस्त्रांनी देईल प्रत्युत्तर देईल, असे म्हणत भारताला पोकळ धमकी दिली आहे. 

पाकिस्तानच्या राजदूताचे हे विधान जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणारे ठरले आहे. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. पाक राजदूतांनी हे देखील सांगितले आहे की, भारताचे सैन्य दस्तावेज लीक झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानवर हल्ल्याची योजना आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, पाकिस्तानला हल्ल्याची शक्यता आहे आणि तो कोणत्याही क्षणी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार आहे.

सिंधू पाणी करार तणावाचे केंद्र 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते खूपच अस्वस्थ आहेत. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वाक्षरी झालेला सिंधू पाणी करार आता तणावाचे केंद्र बनला आहे. जर भारताने सखल भागात पाणी थांबवले किंवा त्याचा प्रवाह वळवला तर ते युद्ध मानले जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याने, भारताने या कराराचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. पाणी आता केवळ एक संसाधन राहिलेले नाही तर ते एक धोरणात्मक शस्त्र बनले आहे.

ताण कमी करणे का महत्त्वाचे?

पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने मुलाखतीत हे देखील मान्य केले आहे की, दोन्ही देश अणुशक्ती आहेत  आणि अशा परिस्थितीत वाढत्या तणावामुळे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येऊ शकतो, असे म्हटले. तर त्यांनी काश्मीर हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. यात रशिया आणि चीनची भूमिका असू शकते, असे म्हटले. मात्र, भारताने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतालाच धक्का बसला नाही तर प्रादेशिक स्थिरतेलाही मोठा धक्का बसला. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा भारत आधीच सीमावर्ती भागात तणावाचा सामना करत होता. भारत सरकारने तातडीने कारवाई केली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीनही दलांना मोकळीक दिली आहे. यासोबतच त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला की, भारत आता बचावात्मक धोरण नव्हे तर आक्रमक धोरण स्वीकारेल.

आणखी वाचा 

India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार