नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आगळीकतेनंतर भारताने लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करुन त्या देशाला इशारा (India Attack On Pakistan) दिला आहे. त्यामुळे पाकिस्तामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन देशभर सायरनचा वाजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश (US Alert for Lahore) दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात (India Vs Pakistan) जाऊ नका, लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसेच देश सोडण्यासाठी सर्व कागदपत्रं तयार ठेवा असे आदेश अमेरिकेने दिले आहेत.
पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
देश सोडण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश
अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानचा हल्ला उधळून लावला
भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक दोन नव्हे तर भारताच्या लष्कराच्या 15 ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. पण भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत. बुधवारी रात्री वायुदलाने पाकिस्तानातून येणारा हल्ला एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केला. एअर डिफेन्स सिस्टीम असलेल्या भारताच्या युनिटचं नाव सुदर्शन चक्र असं आहे.
भारताने नेमकं सुदर्शन चक्र पाकिस्तानवर सोडत पाकिस्तानी हल्ला निष्प्रभ केला. ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. मात्र याबाबत अजून अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही. भारताच्या एस 400 या सिस्टीमने पाकिस्तानातून आलेली सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन उडवून लावले.
ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार
भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला मोठा दणका दिला. मात्र अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. भारताने पाकिस्तानला आणखी एक खूप मोठा दणका दिला. पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केली. भारतीय लष्कराने प्रेस नोट जारी करून ही घोषणा केली.
पाकिस्तानने चीनची एचक्यू 9 ही एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती. ती भारताने हल्ला करून बेचिराख करून टाकली. त्यामुळे लाहोर या महत्त्वाच्या शहरावरचं हवाई छत्रच नष्ट झालं आहे.