Operation Sindoor:जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत ठार करण्यात आलं. त्यानंतर भारताने आज (7 May) पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर म्हटले गेले.(IND VS PAK)  या घटनेनंतर जगभरातील देशांचे लक्ष भारत आणि पाकिस्तानवर आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कारवाया करत भारताने दहशतवादाविरोधात एअरस्ट्राईक करत लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मदसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करत पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतला. दोन्ही देशांमध्ये आता प्रचंड तणाव असून ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कर्तारपूर कॉरिडॉर (Kartarpur Corridor) बंद करण्यात आला आहे. सर्व सीमा ब्लॉक करण्यात आले होते.

दरबार साहिब गुरुद्वाऱ्यात जाण्याची परवानगी नाकारली

पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉर बुधवारी यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  दरम्यान आज सकाळी गुरुद्वाऱ्याला भेट देण्यासाठी भारतातून सुमारे 500 यात्रेकरूंनी नोंदणी केली होती. जवळपास 100 जण सीमा ओलांडण्यासाठी आले होते मात्र कॉरिडॉर बंद असल्याने त्यांना त्यांच्या घरी परतण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि पाकिस्तानच्या राजनैतिक संबंधांवर अनेक निर्बंध लादले होते. या निर्बंधांमध्ये अटारीचे पोस्ट बंद करणे आणि सार्क व्हिसा सूट योजनांवर भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणे अशा काही कारवाया करण्यात आल्या. त्यावेळी कर्तारपूर कॉरिडॉर खुला होता. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर पंजाबमधील कर्तारपूर कॉरिडॉर बंद ठेवण्यात आला.

कर्तारपूर कॉरिडॉर एवढा महत्त्वाचा का?

कर्तारपूर कॉरिडॉर हा व्हिसा -मुक्त सीमा ओलांडणारा तसेच एक धार्मिक कॉरिडोर आहे जो पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला पंजाबमधील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक गुरुद्वाराशी जोडतो . त्यामुळे भारतीय यात्रेकरू आणि (OCI) कार्डधारकांना भारत पाकिस्तान सीमेपासून 4.7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्तारपुरमधील पवित्र शीख मंदिराला व्हिसाशिवाय भेट देण्याची परवानगी मिळते . शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी त्यांचे शेवटचे दिवस येथे घालवल्याने भारत पाकिस्तान आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी  दरबार साहिब गुरुद्वारा हा श्रद्धेचे स्थान आहे .

ऑपरेशन सिंदूरनंतर भाविकांना परत पाठवले

बुधवारी सकाळी अनेक भाविक पाकिस्तानातील गुरुद्वारात दर्शन घेण्यासाठी कॉरिडॉरवर पोहोचले .परंतु त्यांना परत जाण्यास सांगण्यात आले .गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त 9 नोव्हेंबर 2019 रोजी कर्तारपूर कॉरिडर उघडण्यात आला होता .सर्वधर्मांच्या भारतीय यात्रेकरूंना वर्षभर गुरुनानक देव यांचे अंतिम विश्रांती स्थान असलेल्या कर्तारपूर येथील ऐतिहासिक गुरुद्वारा यामध्ये व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी आहे .भारत आणि पाकिस्तानमधील करारानुसार या ऐतिहासिक गुरुद्वारात दररोज 5000 यात्रेकरू दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात .मात्र 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या कारवाईमुळे हा कॉरिडॉर बंद करण्यात आला .

हेही वाचा: