बीजिंग: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच देशाबाहेर गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे किम जोंग अत्यंत गोपनीयपणे चीन दौऱ्यावर आहे.


किमच्या या दौऱ्यावर लक्ष ठेवून असलेल्या विविध तीन सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

2011 मध्ये उत्तर कोरियाची सूत्रं हाती घेतल्यानंतर किम जोंग पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर आहे. किम जोंग रविवारी आणि सोमवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये होता, असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे.

यापूर्वी एक उत्तर कोरियाची विशेष ट्रेन चीनमध्ये दाखल झाल्याचा दावा, जपानी मीडियाने केला होता. सुसज्ज अशी ट्रेन उत्तर कोरियातून चीनमध्ये दाखल झाली होती. याच ट्रेनमधून किम जोंग उत्तर कोरियातून चीनमध्ये आल्याचं जपानी मीडियाने म्हटलं होतं.

दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर कोरिया आणि चीनमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी किंम जोंग चीनमध्ये आल्याचं जपानी मीडियाने म्हटलं आहे.

उत्तर कोरियात किम जोंग सातत्याने करत असलेल्या क्षेपणास्त्र आणि अणू चाचण्यांमुळे संपूर्ण जग वैतागलं आहे.  मात्र त्याला चीनची फूस असल्याचं अनेकवेळा दिसून आलं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला उत्तर कोरियाला जाहिर पाठिंबा देता येऊ शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध काही प्रमाणात ताणले होते. त्या पार्श्वभूमीवर किम जोंगचा हा दौरा मानला जात आहे.

VIDEO: