Baltic Sea Methane Leak News : बाल्टिक समुद्रामध्ये (Baltic Sea) पाईपलाईनचा स्फोट होऊन मोठी वायू गळती (Gas Leak) होत आहे. बाल्टिक समुद्रातळाशी 'नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन'मध्ये (Nord Stream Pipeline Rupture) स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची (Methane) गळती होत आहे. बाल्टिक समुद्रामध्ये 100 मीटर खाली हा स्फोट झाला आहे. त्यामुळे मिथेन वायूची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. दर तासाला सुमारे 23 हजार किलो मिथेन गॅसची गळती होत आहे. यामुळे युरोपीय देशांवर मोठं संकट कोसळलं आहे.
काय आहे नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन?
नॉर्ड स्ट्रीम 2 (Nord Stream 2) ही रशियापासून जर्मनीला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी अंडरवॉटर पाईपलाईन आहे. या पाईपलाईनची लांबी 1234 किलोमीटर असून ही बाल्टिक समुद्रात 100 मीटर खोल अंतरावर आहे. नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन बाल्टिक समुद्रातून जाते. या पाईपलाईनद्वारे गॅझप्रॉम आणि अनेक युरोपियन ऊर्जा कंपन्यांना पुरवठा केला जातो. 26 सप्टेंबरला पाईपलाईनमध्ये स्फोट झाला होता. यानंतरही या पाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. आता या स्फोटाचे काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत.
बाल्टिक समुद्रातील जैवविविधता धोक्यात
नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनच्या स्फोटामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती होत आहे. यामुळे बाल्टिक समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. दरम्यान, पाईपलाईन स्फोटासंदर्भात रशियावर गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. युरोपीय देशांमधील इंधन पुरवठा बंद करण्यासाठी रशियाने पाईपलाईनाचा स्फोट घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनमधून दर तासाला 22,920 किलो मिथेन गॅस गळती होत आहे. हा गॅस 2 लाख 85 हजार किलो कोळशा जाळण्यासाठी पुरेसा आहे. मिथेन गॅस ग्लोबल वॉर्मिंगचं महत्त्वाचं कारण मानलं जातं, त्यामुळे ही मिथेन गळती युरोपीय देशांसाठी मोठी समस्या आहे.
मिथेनची आतापर्यंतची सर्वात मोठी गळती
संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमने (UNEP - United Nations Environment Programme) सांगितलं की, 'नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन लवकर दुरुस्त न केल्यास मोठ्या प्रमाणात सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचेल. याशिवाय सागरी वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. बाल्टिक समुद्राखालील नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन फुटणे ही मिथेनची आतापर्यंतची सर्वात मोठी गळती आहे.'