Nobel Peace Prize नवी दिल्ली : दरवर्षी 10 ऑक्टोबरला नॉर्वेच्या नोबेल समितीकडून शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून काही देशांनी शिफारस देखील केली होती. मात्र, नॉर्वेच्या नोबेल समितीनं आज पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांना जाहीर केला. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळाल्यानं व्हाइट हाऊसचा भ्रमनिरास झाला आहे. नोबेल समितीनं शांततेपेक्षा राजकारण करतात हे दाखवून दिल्याचं व्हाइट हाऊसमधील अधिकारी स्टीवन चेऊंग यांनी म्हटलंय.
White House Reaction on Nobel Peace Prize : व्हाइट हाऊसनं काय म्हटलं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल जाहीर झाला नसल्यानं व्हाइट हाऊसनं थेट नॉर्वेच्या नोबेल समितीवर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांचे सहायक आणि व्हाइट हाऊसमधील अधिकारी स्टीवन चेऊंग यांनी नोबेल समितीDcलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ते म्हणाले, "अध्यक्ष ट्रम्प शातता करार, युद्ध थांबवणं आणि जीव वाचवणं सुरु ठेवतील. त्यांचं ह्रदय मानवतेचं असून इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वत हलवू शकणारं त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. नोबेल समितीनं ते शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचं सिद्ध केलं. "
शांततेचा नोबेल मारिया मचाडो यांना जाहीर
द नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दरवर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला जातो. या समितीनं नोबेल शांतता पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांसाठी मारिया मचाडो यांनी सातत्यानं काम केलं. हुकुमशाही ते लोकशाही या स्थित्यंतरासाठी त्यांनी शांततेच्या मार्गानं संघर्ष केला, यासाठी शांततेचं नोबेल देण्यात येत असल्यानं समितीनं म्हटलं.
शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं लॉबिंग
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी जोरदार लॉबिंग केल्याचं पाहायला मिळाली. सहा युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. भारत आणि पाकिस्तानला व्यापाराच्या मुद्यावर शस्त्रसंधी करायला लावल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. भारतानं मात्र, कोणीही मध्यस्थी केली नसल्याचं म्हटलेलं.