Coronavirus New Variant : कोरोनातून (Covid 19 Epidimic) जग आता कुठे सावरू लागलं होतं मात्र, कोरोनाचा (Corona) व्हायरल काही पिच्छा सोडताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने (New Corona Variant) जगाची चिंता वाढवली आहे. या नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या एका नवीन प्रकाराने ब्रिटनला (New Corona Variant in UK) विळखा घातला आहे. या नवीन कोरोना व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे.


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका!


ब्रिटनमध्ये पसरलेल्या या व्हेरियंटला EG.5.1 म्हणून संबोधलं जातं आहे. त्यालाच EG.5.1 Eris असं टोपणनाव देण्यात आले आहे. इंग्लंडमधील आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचं म्युटेशन असल्याचं सांगितलं आहे. याची लक्षणे खूप सामान्य आहेत. सध्या या व्हेरियंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये युनायटेड किंगडममध्ये (Eris in UK) कोरोनाचा एक नवीन प्रकार आढळल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, एरिस नावाचा कोविड व्हेरियंट ब्रिटनमध्ये वेगाने पसरत आहे.


ब्रिटनमध्ये एरिस व्हेरियंटचे वाढते रुग्ण


संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूमध्ये अजूनही सतत म्युटेशन होत आहे. कोरोना व्हायरस बदलत्या वातावरणानुसार स्वत: मध्ये बदल करत असल्याने नवीन व्हेरियंटचा धोका कायम आहे. सर्व देशांनी कोरोनाबाबत सावध राहण्याची गरज आहे. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) च्या मते, कोविड-19 चा एक नवीन प्रकार युनायटेड किंगडममध्ये वेगाने पसरत आहे, ज्यामुळे देशातील आरोग्य अधिकार्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. 


एरिसची लक्षणे काय आहेत?


मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे. दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये दम लागणे, वास कमी होणे आणि ताप ही आता मुख्य लक्षणे नाहीत. सध्याच्या खराब हवामानामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, असं मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केलं आहे.


पुन्हा कोविड लाट येणार?


UKHSA च्या अहवालानुसार, सध्या ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 1.97 टक्के इतकं आहे. देशातील प्रत्येक सात कोरोना संक्रमितांपैकी एका रुग्णाला नवीन एरिस व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, या नवीन व्हेरियंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नवीन कोविड लाट येण्याची शक्यता आहे.