नेपाळमधील बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, सहा भारतीयांसह सात जणांचा मृत्यू


काठमांडू : नेपाळच्या (Nepal) बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात (Accident) झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा (Indian Citizen) समावेश असून एक नागरिक नेपाळचा आहे. मृत्यू झाला. सर्व मृत भारतीय नागरिक हे राजस्थान (Rajasthan) जिल्ह्यातील होते. तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यातील लोहारपटी-5 मधील एक नागरिक या दुर्घटनेत मृत पावला.


या बसला रात्री एक वाजता अपघात झाला. बस क्रमांक मधेश प्रदेश-03-001 बी 7994, जी काठमांडूहून महोत्तरीच्या लोहारपट्टी इथे जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. दुर्घटनेत सहा भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.






सहा भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू


मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. बहादूर सिंह (वय 67 वर्ष), सत्यवती (वय 60 वर्षे), राजेंद्र चतुर्बेदी (वय 70 वर्षे), श्रीकांत चतुर्बेदी (वय 65 वर्षे), बैजंती देवी (वय 67 वर्षे), मीरा देवी (वय 65 वर्षे) अशी मृत भारतीय नागरिकांची नावं असून ते सर्व जण राजस्थानमधील होते. तर महोत्तरीच्या लोहारपटी-5 मधील 41 वर्षीय विजय लाल पंडित यांनी या दुर्घटनेत जीव गमावला.


जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु


तर अपघातात जखमी झालेल्या 17 जणांवर हेटोंडामधील विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ज्या भाविकांची प्रकृती सामान्य होती किंवा ज्यांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यांना उपचारानंतर सोडण्यात आलं.