'इस्रायलमध्ये मायबोली या मराठी भाषेतील नियतकालिकाचं प्रकाशन होत असल्याचं ऐकून आनंद झाला.' असं पंतप्रधान मोदी कौतुकाने म्हणाले. नोआ मोसिल हे मायबोलीचे संपादक आहेत. विशेष म्हणजे गेल्या 45 वर्षांपासून जेरुसलेममध्ये या अंकाचं नियमित प्रकाशन होतं. नोआ मोसिल हे मराठी भाषिक ज्यू आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण महाडमधील तळा गावात झालं आहे.
जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : पंतप्रधान मोदी
'कोच्चीमधून आलेले नागरिक इथे ओणमही उत्साहात साजरा करतात. भारतातून आलेल्या ज्यू नागरिकांनी इस्रायलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्रायलच्या वाळवंटात हरितक्रांतीचा विचार पुढे आला तेव्हा भारतातून आलेल्या ज्यू नागरिकांनी दिवसरात्र घाम गाळला.' असंही मोदी पुढे म्हणाले.
70 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान इस्रायल दौरा करत असून एका जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना आपल्या मनात असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.