काबूल : अफगाणिस्तानमध्ये तुम्ही दहा जणांना त्यांचा जन्मदिवस विचारलात, तर त्यापैकी किमान चौघं तरी 1 जानेवारी हे उत्तर देतील. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्याचं कारण मोठं रंजक आहे. ज्यांना आपली जन्मतारीख माहित नाही, त्यांच्यासाठी ही तारीख सोयीस्कर आहे.
जन्माचा दाखला किंवा अधिकृत नोंदणी नसल्यास अनेक अफगाणी नागरिक आपलं वय ऐतिहासिक घटनांशी जोडून मोजतात. मात्र फेसबुकसारख्या सोशल मीडियावर एखादी जन्मतारीख निवडणं अनिवार्य असतं. त्याचप्रमाणे पासपोर्ट, व्हिसासाठी जन्मदिनांक निवडणं भाग पडतं. त्यामुळे अनेकांनी 1 जानेवारी हा वाढदिवस निवडला आहे.
हिजरी सालगणनेनुसार 21 मार्च हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. मात्र यापासून वाचण्यासाठी जन्मतारीख माहित असलेले काही जणही 1 जानेवारीलाच बर्थडे सेलिब्रेट करतात. 'नवभारत टाइम्स'ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.
गेल्या काही वर्षांत मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांना सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली आहे. सरकारकडूनही नागरिकांना जन्मतारीख असलेली संगणकीकृत राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची तयारी सुरु आहे, मात्र राजकीय आणि तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली आहे.