मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा तीनशेच्या घरात गेल्याची भीती आहे. रविवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले. सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे.
या स्फोटात जखमींची संख्याही 300 हून जास्त आहे. ढिगाऱ्यांखालील मृतदेह उपसण्याचं काम सुरु असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. जगभरात गेल्या काही वर्षांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी हा सर्वात भीषण मानला जात आहे.
सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर शेकडो निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले.