मुंबई : 'मिस वर्ल्ड' या ब्यूटी पेजंटमध्ये यापुढे ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही अधिकृतपणे सहभागी होता येणार आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र त्यासाठी जन्म दाखला किंवा पासपोर्टवर लिंगाच्या रकान्यात त्या 'महिला' असल्याचा उल्लेख असणं अनिवार्य आहे.


ट्रान्सजेंडर व्यक्तींनी त्यांना हवं ते करावं, त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, ते करावं, मात्र स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल, तर नियम आणि अटी पाळणं बंधनकारक आहे. 'मिस वर्ल्ड'मध्ये सहभागी होण्यासाठी एकमेव निकष असतो, तो म्हणजे तुम्ही महिला असणं. त्यासाठी पासपोर्ट किंवा जन्माचा दाखल हा अधिकृत मानला जातो, असं ज्युलिया मोर्ले म्हणाल्या.

मी तुमच्या सेक्शुअॅलिटी (लैंगिकता) बाबत भाष्य करणारी कोण आहे? ते माझं काम नाही. मी उमेदवारांचं स्वागत करायला उभी आहे. आमच्या स्पर्धेत तुमचं स्वागतच आहे. एखादी व्यक्ती जशी आहे, तशी तिला स्वीकारायला हवं, असंही त्या म्हणतात.

स्पेनची अँजेला पॉन्स ही 'मिस युनिव्हर्स 2018'मध्ये सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर होती. 2012 मध्ये कॅनडाच्या जेना तालाकोवाने मिस वर्ल्डमध्ये भाग घेतला होता, मात्र तिला अपात्र ठरवण्यात आलं.