तायपे : तैवानच्या संसदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरुन जोरदार राडा झाला आहे. भर संसदेत झालेल्या जोरदार मारहाणीत अनेक खासदार जखमी झाले आहेत. यावेळी कागदपत्रं फाडली गेली तसेच इमारतीच्या काचा देखील फोडल्या. माहितीनुसार कोउमितांग पक्षाचे सदस्य सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सदस्यांशी भिडले. त्यांनी कंट्रोल युआनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललेल्या चेन चू यांना संसदेच्या मुख्य चेंबरमध्ये जाऊ देण्यास मनाई केली होती. यामुळं दोन्ही पक्षाच्या समर्थक खासदारांमध्ये जोरदार मारपीट झाली. यावेळी संसदेत खासदारांनी एकमेकांवर कागद फेकले, नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील झाली.
कोउमितांग पार्टीचे एक खासदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या गोंधळात दोन्ही पक्षांचे अनेक खासदार जखमी झाले. तैवानच्या संसदेत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी देखील या संसदेत मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. चार वर्षांपूर्वी सरकारचं सुधारणा धोरण आणि पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला होता.
चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्यक्षपदी निवड
चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही एजंसी सरकारच्या विविध विभागांच्या कामावर लक्ष ठेवते. कोउमितांग पक्षाने या निवडीचा विरोध केला होता. ज्यावेळी तैवानमध्ये कोउमितांग पक्षाची (केएमटी)ची सत्ता होती, त्यावेळी चेन यांना सहा वर्ष तुरुंगात पाठवलं होतं.
या आधी जुलै 2017 मध्ये देखील तैवानच्या संसदेत जोरदार राडा झाला होता. त्यावेळी देखील खासदारांनी एकमेकांना मारपीट केली होती. संसद भवनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी महिला खासदार देखील एकमेकांशी भिडल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या.