Man Breaks Into US Airport to Steal Plane :  अमेरिकेतील लष्करी तळ 'एरिया 51' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी एखादा एलियन पाहिल्याचा दावा करण्यात आला नाही. तर, एका वेगळ्याच कारणाने हा तळ चर्चेत आला आहे. एका 36 वर्षाच्या व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था तोडून आपली कार व्हेगास येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये घुसवली. विमानतळाची सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून त्याने आपली कार एका विमानाजवळ रोखली. 


ही घटना 8 डिसेंबर रोजीची आहे. मॅथ्यू हँकॉक असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला चक्क विमान चोरायचे होते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, हँकॉकने अटलांटिक एव्हिएशनच्या कर्मचाऱ्यांना धमकावले. माझ्याजवळ बॉम्ब असून मी या जागी स्फोट करेल अशी धमकी त्याने दिली. 


कारमध्ये खोटा बॉम्ब


विमानतळात घुसखोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली करत हँकॉकच्या गाडीला अटकाव करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कारची आणि विमानतळावरील विमानांची धडकही टळली. पोलिसांना कारमध्ये एका खोटा बॉम्बही आढळला. अग्निशमन यंत्राला काही तारा जोडून हा खोटा बॉम्ब तयार करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हँकॉकची चौकशी करण्यात आली. 


या अजब कारणासाठी हवे होते विमान 


पोलिसांनी सांगितले की, हँकॉकला एलियन पाहण्यासाठी विमान चोरी करायचे होते. त्यासाठी त्याला 'एरिया 51' गाठायचे होते. पोलिसही या अजब उत्तराने चक्रावले आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. 


विमानतळाचे सार्वजनिक माहिती अधिकारी जो राजचेल यांनी सीएनएनला सांगितले की, या घुसखोरीमध्ये काही सुरक्षा अडथळ्यांचे नुकसान झाले. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha