लंडन : महात्मा गांधींच्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलान इंग्लंडमध्ये लिलाव झाला. या चष्म्याला तब्बल 2 कोटी 55 लाख रुपये इतकी किंमत मिळाली आहे. या चष्म्याला 14 लाख रुपये मिळतील, असं वाटत होतं. ऑनलाईन लिलावामध्ये ही बोली वाढत गेली आणि अखेर 2 कोटी 55 लाख रुपयांवर ही बोली थांबली. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन' कंपनीने लिलाव आयोजित केला होता. अमेरिकेच्या संग्रहकाने हा चष्मा खरेदी केला आहे.





 ऑक्शन्स कंपनीचे लिलावकर्ते ऍण्डी स्टोव म्हणाले, 'अविश्वसनीय गोष्टीला अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. ज्यांनी बोली लावली त्यांचे धन्यवाद. या चष्म्याच्या लिलावातून आम्ही लिलावाचा विक्रमच केला नाही, तर याचं ऐतिहासिक महत्त्वही वेगळंच आहे.'


इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचा हा चष्मा होता. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हा चष्मा भेट दिला होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहे. लिलावात कंपनीला 14 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची अपेक्षा होती.