संसदेबाहेर काय झालं?
लंडनमध्ये 22 मार्चला दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी एका हल्लेखोराने संसदेजवळ टेम्स नदीवरील वेस्टमिन्स्टर ब्रीजवर कार अतिशय वेगाने आणली. यामुळे दोघांचा चिरडून मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. यानंतर ही कार संसदबाहेरील रेलिंगला धडकली.
हल्लेखोर कोण होता?
केवळ एक हल्लेखोर होता. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही, असं इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितलं.
संसदेबाहेर झालेल्या हल्ल्यामागे कट्टरतावादी इस्लामिक संघटना असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हातात चाकू घेऊन हल्लेखोर कारमधून बाहेर आला आणि संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबवलं. मात्र त्याने एका पोलिसाला चाकून भोसकलं, ज्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसाकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. यानंतर शस्त्रधारी पोलिसांनी हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या.

मृत आणि जखमींची माहिती
आतापर्यंत केवळ मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 48 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल कीथ पामर 15 वर्षांपासून पोलिस सेवेत होते.
जखमींमध्ये आणखी तीन पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
वेस्टमिन्स्टर ब्रीजवर जखमी झालेल्या लोकांमध्ये दक्षिण कोरियाच्या पाच पर्यटक आणि रोमानियाच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. लँकाशरच्या एका विद्यापीठातील चार विद्यार्थीही जखमी झाले आहेत. स्कूल ट्रिपसाठी लंडनमध्ये आलेले फान्सची तीन मुलंही जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी असलेल्या एका महिलेला टेम्स नदीतून वाचवण्यात आलं आहे. पुलावरुन ती नदीत कशी कोसळली हे अजून स्पष्ट झालं नाही. तर एका फोटोग्राफरने सांगितलं की, त्याने एका व्यक्तीला पुलावरुन खाली फुटपाथवर पडताना पाहिलं.
लंडनमध्ये सुरक्षा व्यवस्था काय?
हल्ला झाला त्यावेळी संसदेचं कामकाज सुरु होतं. त्यानंतर ते स्थगित करण्यात आलं. राजकीय नेते, पत्रकार तसंच इतरांना जवळपास पाच तास संसदेतून बाहेर जाऊ दिलं नाही.
संसदेपासून जवळच्या वेस्टमिन्स्टर एबे चर्चमधून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
गुरुवारी म्हणजे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज नियमित वेळेत सुरु होईल.
येत्या काळात लंडनच्या रस्त्यावर शस्त्रधारी आणि विनशस्त्रधारी पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल, असं लंडनच्या महापौरांनी सांगितलं.
दरम्यान, ब्रिटनमध्ये धोक्याची शक्यता लक्षात घेऊन अती गंभीर परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. याचा अर्थ तिथे हल्ला होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.