Liz Truss Met Queen Elizabeth: इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth ll) यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूक निकालांमध्ये लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला. निवडणूक निकालात लिझ ट्रस  (Liz Truss) यांना 81,326 आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक  (Rishi Sunak) यांना 60,399 मते मिळाली.


ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या औपचारिक प्रक्रियेचा भाग म्हणून लिझ ट्रस यांनी सोमवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅस्टल येथे राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांनी औपचारिकपणे ट्रस यांना नवीन सरकार स्थापन करण्यास सांगितले आहे. आजच माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला राजीनामा राणींकडे सुपूर्द केला. 96 वर्षीय राणी एलिझाबेथ आपल्या  वार्षिक सुट्टीसाठी अ‍ॅबर्डीनशायरच्या (Aberdeenshire) निवासस्थानी आहेत. यामुळेच लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसऐवजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅस्टलमध्ये ट्रस यांनी राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. 


ट्रस राणींना भेटून लंडनला परतल्या 


बालमोरल कॅस्टल येथे राणीची भेट घेऊन नवीन पंतप्रधान लिझ ट्रस लंडनला परतल्या आहेत. ट्रस लंडनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे पंतप्रधान म्हणून आपले पहिले भाषण देतील आणि त्यानंतर काही प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांची नावे जाहीर करतील. लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांनी ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. हे दोन्ही नेतेही कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे होते.


दरम्यान, लिझ ट्रस या आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. मात्र त्या आधीपासून या पक्षात नव्हत्या. कंझर्व्हेटिव्ह, लेबर आणि स्कॉटिश नॅशनल पार्टी नंतर यूकेमधील चौथा मोठा पक्ष लिबरल डेमोक्रॅट म्हणून त्यांनी सुरुवात केली. लिझ ट्रस यांचा जन्म ऑक्सफर्डमध्ये झाला. त्याचे वडील गणिताचे प्राध्यापक आणि आई नर्स होती. ट्रस यांनी ऑक्सफर्डमधून पदवी प्राप्त केली. जिथे त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम केले. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2010 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Britain PM Election Result: लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत