डेरना (लिबिया) : उद्ध्वस्त लिबियात डॅनिअल चक्रीवादळाने आलेल्या विनाशकारी पावसानंतर दोन धरण फुटून आलेल्या पुरात तब्बल 5 हजार 300 जणांचा बळी गेला आहे. दोन धरण फुटून पाणी थेट लिबियाच्या पूर्वेकडील डेरना शहरात घुसल्याने महापुराच्या तांडवात 5 हजार 300 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. 


डेरना शहरात मृत्यूचे तांडव सुरु असतानाच वाहून गेलेले अनेकजण समुद्राला जाऊन मिळाल्याने लाटांमधून डझनच्या डझन मृतदेह बाहेर पडत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लिबियाच्या पूर्वेकडील प्रशासनातील मंत्री हिशाम चकिओत यांनी याबाबत माहिती दिली. लिबियातील डेरना शहरात निर्माण झालेल्या विनाशकारी प्रलयाने मदतीसाठी आक्रोश सुरु आहे. काही मृतदेह प्लास्टिक बॅगांमध्ये गुंडाळण्या आले असून काही मृतदेहांचा सामूहिक दफनविधी करण्यात येत आहे.


मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता 


लिबियात आलेल्या विनाशकारी डॅनियल वादळानंतर झालेल्या पावसाने दोन धरण फुटल्याने पाणी शहरात घुसले. डेरना शहरात तब्बल 10 फुटांवर पाणी आल्याने मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. डेरना शहरात बचाव पथके वाचलेल्यांचा शोध घेण्याच्या आशेने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगारे बाजूला करत आहेत. परंतु, झालेला विनाश पाहता आशा मावळली आहे. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. 


दरम्यान, किमान 10,000 लोक बेपत्ता आहेत, तर 30,000 लोक विस्थापित झाल्याचा अंदाज आहे, असे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने म्हटले आहे. शवगृहे आणि रुग्णालये मृतदेहांनी खचाखच भरून गेली आहेत. डेरनाजवळील रुग्णालयात काम करणारे लिबियाचे डॉक्टर नजीब तरहोनी म्हणाले की आणखी मदतीची गरज आहे.


डेरना शहरात नेमके काय घडले?


वादळ डॅनियलमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व लिबियातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पूर आला, ज्यावर वेगळ्या सरकारचे नियंत्रण आहे. रविवारी तसेच सोमवारी बेनगाझी, सुसा, बायदा आणि अल-मर्ज या शहरांना वादळाचा तडाखा बसला, परंतु बंदरांचे शहर असलेल्या डेरनाला सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसाने सोमवारी शहरापासून वरच्या दिशेला असलेली दोन धरणे फुटलील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दऱ्यांमधून खाली आल्याने शहराला पाण्याने वेढा दिल आणि पाहता पाहता रस्ते आणि पूल नष्ट झाले. हे शहर पर्वतांनी वेढलेले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी 3 मीटर (10 फूट) पर्यंत वाढल्याने अचानक पूर आला. तेव्हापासून समोर आलेले फुटेज आणि फोटोंमधून विनाश दर्शवून देत आहेत. त्यामुळे डेरणा नदीकाठी विनाश झाला आहे. नदीकाठापासून दूर असलेल्या बहुमजली इमारतींचेही अतोनात नुकसान झाले असून अंशत: गाळात कोसळल्या आहेत. हजारो वाहने चिखलात गाडली गेली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या