न्यूयॉर्क : सीरियातील युद्धाची झळ जनसामान्यांपर्यंत पोहचली आहे. विशेष म्हणजे फक्त सीरियाच नाही, तर अमेरिकेत राहणारा एक चिमुरडाही हे पाहून हेलावला आहे. 'ओमरान' या युद्धाचा फटका बसलेल्या लहानग्याचा 'तो' फोटो पाहून अमेरिकेतील अॅलेक्स नावाच्या 6 वर्षीय मुलाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र लिहिलं.


'मला आणि माझ्या कुटुंबीयांना सीरियातील शरणार्थी ओमरानला दत्तक घ्यायचं आहे. कृपया तुम्ही आम्हाला या कामात मदत करा' अशी मागणी अॅलेक्सने ओबामांकडे केली आहे. अॅलेक्सची चिठ्ठी वाचून ओबामाही भारावले आणि त्यांच्या भावनांचं कौतुक केलं.

गेल्या महिन्या अलेप्पोमध्ये झालेल्या हल्ल्यात 5 वर्षांच्या ओमरानचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो व्हायरल झाला होता. धूळ आणि रक्ताने चेहरा माखलेल्या ओमरानचा फोटो पाहून कोणाच्या मनाला पाझर फुटेल. सीरियातील नागरी युद्धाचं हे प्रतीक मानलं जातं.



'तुम्ही ओमरानला आमच्यापर्यंत पोहचवण्यात मदत कराल का? तो माझा भाऊ होईल आणि माझ्या कुटुंबातला एक सदस्य. मी त्याची भेट माझ्या शाळेतल्या ओमरशी घडवून देईन, कारण ओमरही सीरियातून आला आहे. आम्ही सगळे एकत्र खेळू, वाढदिवस साजरा करु. ओमरानकडून आम्ही त्याची भाषाही शिकू. माझी बहिण कॅथरिन ओमरानसोबत तिची खेळणीही शेअर करेल.' असं अॅलेक्सने पत्रात म्हटलं आहे.

ओबामांनी चिमुकल्या अॅलेक्सच्या पत्राचं कौतुक न्यूयॉर्कमधील रेफ्यूजी समिटमध्ये केलं. या लहानग्याने घडवलेल्या माणुसकीने आपण भारावल्याचं ते म्हणतात.

पाहा व्हिडिओ :