इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदे असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार आहेत. कुलभूषण 25 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी आणि आईला भेटणार आहेत.


पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या परवानगीनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आई आणि पत्नीला याबाबत माहिती दिली. भारताकडून पाकिस्तानला कुलभूषणच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमीही घेण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद फैझल यांनी सांगितलं की, या भेटीदरम्यान भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील. आम्ही कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला व्हिसा देणार असल्याचं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे. मी कुलभूषण यांची आई अवंतिका जाधव यांच्याशी बोलले असून त्यांना याबाबत माहिती दिली आहे, असं ट्वीट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे.

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आक्षेप घेत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.