इस्लामाबाद: कुलभूषण जाधवप्रकरणी भारतानं कडक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.


आम्ही धमक्यांना  घाबरत नसून, कोणालाही प्रत्युत्तर देण्यास पाकिस्तानी सैन्य सज्ज असल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे.

PAF अॅकॅडमीच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना शरीफ यांनी हा इशारा दिला. त्यांनी भारताचं नाव घेतलं नसलं, तरी भारतालाच उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं.

पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून शेजारच्या देशांशी सौदार्हपूर्ण संबंधित ठेवण्यास पाकिस्तान नेहमीच प्राधान्य देत असल्याचं शरिफ यांचं म्हणणं आहे. विकास आणि सहकार्य हेच पाकिस्तानचं धोरण आहे. मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी पाकिस्तान सदैव प्रयत्न करत आला आहे. पण, हे करत असतानाच आमच्या देशाचं संरक्षण करताना मागे- पुढं पाहिलं जाणार नाही असंही शरीफ यांनी नमूद केलं आहे.

त्यामुळं कुलभूषण जाधव प्रकरणात जागतिक स्तरावर दबाव वाढण्याची शक्यता असताना पाकिस्तान मात्र याप्रकरणी बचावात्मक धोरण स्वीकारताना दिसतो आहे.

लोकसभेत पाकविरोधी आवाज 

पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटत आहेत.  कुलभूषण यांच्यासोबत सरकार पूर्णपणे न्याय करेल, असं आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. तसंच त्यांच्या सुटकेसाठी काहीही करण्यास सरकारची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तर परराष्ट्र सुषमा स्वराज यांनीही याप्रकरणी लोकसभेत निवेदन सादर केलं.. पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पुरावे नाहीत. त्यामुळं पाकिस्तानला दोन्ही देशातील संबंध चांगले ठेवायचे असतील, तर नवाज शरीफ सरकारनं याप्रकरणी लक्ष घालावं असं स्वराज म्हणाल्या.

कुलभूषण जाधवांना वाचवा – ओवेसी 

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

बलुचिस्तानात अटक

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.

कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे.

भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही.

पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी 10 एप्रिलला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.  रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

भारताचे पाकिस्तानवर ताशेरे

कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.

कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.

ठोस पुरावे नाहीत

हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवांविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं.

मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

कुलभूषण जाधवांना सोडवण्यासाठी शक्त ते सर्व करु : राजनाथ सिंह 

गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, सुषमा स्वराज यांचा इशारा

सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी

… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी