इस्लामाबाद : मुस्लीमबहुल पाकिस्तानच्या संसदेत आता हिंदू-दलित आवाज दुमदुमणार आहे. कारण, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्णा कुमारी कोल्ही यांची देशाच्या पहिल्या हिंदू दलित महिला सिनेटर म्हणून निवडली गेली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने रविवारी याबाबतची घोषणा केली.
कृष्णा कुमारी कोल्ही या थारच्या रहिवासी आहेत. त्या सिंध प्रांतातील अल्पसंख्याक वर्गासाठी राखीव मतदारसंघातून सिनेटर म्हणून निवडून आल्या. यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीने रत्ना भगावनदास चावला यांना सिनेटर म्हणून निवडले होते.
कृष्णा कुमारी कोल्हींचा परिचय
कृष्णा यांचा जन्म 1979 रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील जुगनू कोल्ही हे शेतकरी आहेत. कृष्णा आणि त्यांचे कुटुंबीय जवळपास तीन वर्ष उमरकोट जिल्ह्यातील कुनरी स्थित सावकाराच्या खासगी जेलमध्ये बंदीवान होते. जेव्हा त्या आणि त्यांचे कुटुंबीय सावकराच्या जेलमध्ये बंदीवान होते, त्यावेळी कृष्णा तिसरीत शिकत होत्या.
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचं लग्न लालचंद यांच्याशी झालं. त्यावेळी त्या नववीत शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं. 2013 मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावासोबत सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या कामातूनच त्या बिलावल भुट्टो-जरदारी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)मध्ये सहभागी झाल्या.
त्यानंतर त्यांची युनियन काऊन्सिल बेरानोच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर काम करताना त्यांनी गरीब आणि वंचितांचे प्रश्न विविध व्यासपीठांवरुन मांडले.
हिंदू-दलित महिलेची पाकिस्तानच्या सिनेटमध्ये निवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2018 11:29 AM (IST)
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्णा कुमारी कोल्ही यांची देशाच्या पहिल्या हिंदू दलित महिला सिनेटर म्हणून निवडली गेली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने रविवारी याबाबतची घोषणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -