मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतल लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे.


डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतलं आजवरचं कदाचित सर्वात वादग्रस्त व्यक्तीमत्त्व. बेछूट वक्तव्यं आणि महिलांविषयी अश्लील टिप्पणीमुळं ट्रम्प यांची प्रतिमा आज काळवंडली आहे. पण एका जमान्यात ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.

रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याआधी ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे. न्यूयॉर्कच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतींपैक ट्रम्प टॉवर, ट्रम्प प्लेस, ट्रम्प पार्क, ट्रम्प प्लाझा... अशा इमारती डोनाल्ड यांनी उभारल्यात. स्वतः ट्रम्प फ्लोरिडात पाम बीच इथं अलिशान ट्रम्प पॅलेसमध्ये राहतात. ट्रम्प यांच्या व्यावसायिक यशाचंच या इमारती प्रतीक आहेत.

ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्पही बांधकाम व्यवसायात होते. ट्रम्प यांनी तो वारसा पुढं नेलाय. गेल्या 40 वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला, की ते जवळपास 100 कंपन्यांचे मालक बनले.

1946 साली न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांचा जन्म झाला. त्यांनी विज्ञानशाखेतून शिक्षण घेतलं. कॉलेजच्या दिवसांत एक विद्यार्थी नेता म्हणून आपली ओळख बनवली. खेळाकडेही त्यांचा ओढा होता. पैजा लावणं आणि त्या जिंकणं हा ट्रम्प यांचा छंदच आहे.

एक कुशल वक्ता अशी ट्रम्प यांची ओळख आहे. भाषणं ठोकण्याची आणि गर्दी जमवण्याची कला त्यांना अवगत आहे. अर्थात निवडणुकीआधी हिलरी यांच्यासोबत झालेल्या वादचर्चेत ते काहीसे मागे पडल्यासारखेही वाटले.

टीकाकारांच्या मते ट्रम्प केवळ मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणाबाजी करतात, मी सगळं सुधारेन असं म्हणतात, पण त्यांच्याकडे तशी कोणतीही ठोस योजना दिसत नाही. अनेकदा बोलण्याच्या ओघात ते वादग्रस्त विधानं करतात.

अमेरिकेतील मुस्लिम समुदाय असो, मेक्सिकन वंशाचे नागरिक असोत किंवा स्त्रिया. या सर्वांविषयी भडकावू विधानांमुळंच ट्रम्प अलीकडे जास्त चर्चेत राहिले आहेत. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून मेक्सिकन आणि सीरीयन शरणार्थी अमेरिकेत येणार नाहीत. पण अशा कट्टर विचारसरणीमुळं एका मोठ्या वर्गात त्यांची लोकप्रियताही वाढली आहे.