टोकियो/मुंबई : भारतामध्ये एखादी ट्रेन पाच-दहा मिनिटं, अर्धा तास, एक-दोन तास आणि कधी कधी तर 12-12 तास उशिरा धावते. भारतीय प्रवाशांसाठी ही बाब नित्याची म्हणू शकतो. जपानमध्ये मात्र वेळेला फारच महत्त्व आहे. त्यामुळे अवघी 20 सेकंद लवकर सुटलेल्या ट्रेनसाठी प्रशासनाने माफीनामा मागितला आहे.


जपानमधील त्सुकुबा एक्स्प्रेस ही ट्रेन त्सकुबा आणि आकिहाबारा दरम्यान धावते. 45 मिनिटांचा प्रवास करणारी ही ट्रेन दररोज सकाळी 9 वाजून 44 मिनिटं आणि 40 सेकंदांनी सुटते. मात्र ही ट्रेन 9 वाजून 44 मिनिटं आणि 20 सेकंदांनीच सुटल्याने गोंधळ झाला.

फक्त 20 सेकंद लवकर सुटलेल्या ट्रेनमुळे स्टेशनवर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे ही रेल्वे चालवणाऱ्या कंपनीला प्रवाशांचा जाहीर माफीनामा मागावा लागला. स्टाफने ट्रेन सुटण्याची वेळ नीट न पाहिल्यामुळे हा गोंधळ झाल्याचं कारण कंपनीने सांगितलं आहे. मिनामी नागारियामा स्थानकावरील प्रवाशांनी कोणतीही तक्रार केली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जपानमधील रेल्वे ही वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आणि विश्वासार्ह मानली जाते. त्यामुळे काही सेकंदांचा बदलही जपानी नागरिकांच्या दृष्टीने मोठा जिकीराचा होतो.

जपानमधील रेल्वे कंपनीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अशाप्रकारचा माफीनामा हे जपानची खासियत असल्याचं काही जण म्हणाले. यूकेमध्ये असं कधीच होऊ शकत नाही, असं लंडनमधील काही ट्विटराईट्सनी म्हटलं. भारतीय ट्वीटर यूझर्सनी तर या घटनेचं कौतुक करत भारतीय रेल्वेच्या नावाने खडे बोल फोडले.