आई-वडिलांनी जंगलात सोडलेला चिमुकला सात दिवसांनी सापडला
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 11:52 AM (IST)
टोकियो (जपान) : जपानमधील जंगलात हरवलेला सात वर्षांचा छोटा मुलगा अखेर सापडला आहे. तो सुखरुप आहे. जपानच्या होक्काईडो बेटांवरील जंगलात त्याच्या वडिलांनीच रागाच्या भरात त्याला शिक्षा म्हणून सोडून दिलं होतं. आपली चूक लक्षात आल्यावर त्याचा शोध सुरु करण्यात आला. जपान सरकारने त्याला शोधण्यासाठी विशेष अभियान राबवलं. तब्बल आठवडाभराच्या शोध मोहीमेनंतर तो जपानी मुलगा सापडला आहे. या मुलाचं नाव यामाटो तंदूका असं आहे. त्याच्या वडिलांनी त्याला जिथे सोडलं होतं, तिथून तब्बल चार किलोमीटर अंतरावर जंगलात असलेल्या सैन्य प्रशिक्षणाच्या छोट्या इमारतीजवळ सापडला. त्याच्या वडिलांनी त्याला खोड्या केल्या, म्हणून 28 मे रोजी जंगलात सोडून दिलं होतं. काय घडलं सात दिवसांपूर्वी? जपानमधील एक जोडपं आपल्या मुलगा आणि मुलीसोबत हायकिंग शनिवारी करण्यासाठी होक्काईदो बेटावरील एका पार्कमध्ये गेलं होतं. या पार्कजवळील पर्वताळ भागात जंगली अस्वलांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. मात्र मुलगा यामातो गाड्या आणि लोकांना दगड मारत असल्यामुळे वैतागलेले पालक त्याला ओरडले. पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली. सुमारे 500 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली. काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली. आधी आपण भाज्या तोडत असताना मुलगा नजर चुकवून पळाल्याचं सांगणाऱ्या जोडप्याने नंतर मात्र कबुली दिली.