जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातच, परराष्ट्र मंत्र्यांची कबुली
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2019 12:37 PM (IST)
14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचाच हात आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानमध्येच असल्याची कबुली परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली. सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना कुरेशी यांनी ही बाब उघड केली. कुरेशी म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, मसूद अजहर पाकिस्तानमध्येच आहे. तो अतिशय आजारी आहे. तो एवढा आजारी आहे की, घराबाहेरही जाऊ शकत नाही." अजहरवरील कारवाईबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा पुराव्यांचा सूर आळवला आहे. जर अतिरेकी कारवायांमध्ये खरंच मसूद अजहरचा सहभाग असल्याचे पुरावे भारताकडे असतील तर ते सादर करावेत. जेणेकरुन पाकिस्तानी न्यायालय आणि लोकांचा त्यावर विश्वास बसेल. ठोस पुरावे असतील तर त्याच्यावर अवश्य कारवाई होईल, असं कुरेशी यांनी सांगितलं. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचाच हात आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा ठोस पुरावा भारताने दिला होता. स्वत: जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आत्मघाती हल्लेखोर आदिलने हल्ल्याआधी एक व्हिडीओ जारी करुन स्वत:ला जैशचा अतिरेकी असल्याचं म्हटलं होतं. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची मागणी भारत सातत्याने संयुक्त राष्ट्रात करत आहे. शिवाय अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही यासाठी प्रस्ताव मांडला आहे. मात्र चीन कायमच भारताच्या प्रयत्नात खोडा घालत आहे. भारताच्या मागणीला समर्थन देण्यास चीनने नकार दिला आहे.