रोम : इटलीमध्ये उड्डाणपूल कोसळल्यामुळे 39 जणांना प्राण गमवावे लागले. जिनोआ शहरात असलेल्या मोरंडी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून रेल्वेमार्गावर पडला. जवळपास 35 गाड्या आणि ट्रक यामध्ये अपघातग्रस्त झाले.

इटलीतील स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इटलीला फ्रान्स आणि इतर पर्यटन स्थळांशी जोडणाऱ्या हायवेवर हा उड्डाणपूल आहे.

मोरंडी हा उड्डाणपूल तब्बल 90 मीटर उंच असून एक किलोमीटर लांब आहे. 1967 साली त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. प्रशासनाकडून या पुलाची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला धारेवर धरण्यात आलं आहे.

सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळे या महामार्गावर वाहतूक अधिक असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुदैवाने ब्रिजखालून कोणतीही ट्रेन जात नव्हती.