Hassan Nasrallah : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने शनिवारी हा दावा केला. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, IDF ने सांगितले की त्यांनी 27 सप्टेंबर रोजी लेबनीज राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर बंकर बस्टर बॉम्बने हवाई हल्ला केला, जेथे नसराल्ला देखील उपस्थित होता.आयडीएफने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, जगाला आता नसरल्लाहला घाबरण्याची गरज नाही. तो दहशत पसरवू शकणार नाही. मात्र नसराल्लाहच्या मृत्यूला हिजबुल्लाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रात भाषण दिल्यानंतर हिजबुल्लाच्या मुख्यालयावर त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून हल्ला करण्याची परवानगी दिली. हल्ल्यानंतर, इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने नेतन्याहू यांचे छायाचित्र जारी केले, ज्यामध्ये ते लँडलाइन फोनवरून लेबनॉनमध्ये हल्ल्याचे आदेश देत आहेत.
नसराल्लाह वयाच्या 32 व्या वर्षी हिजबुल्ला प्रमुख
नसराल्लाह 1992 पासून इराण समर्थित हिजबुल्ला या संघटनेचे प्रमुख होता. जबाबदारी मिळाली तेव्हा तो अवघ्या 32 वर्षांचा होता. नसरल्लाह संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. इस्रायलने हिजबुल्लाचे संपूर्ण नेतृत्व 2 महिन्यांतच संपवले आहे. इस्रायलने 30 जुलै रोजी लेबनॉनवर हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा दुसरा सर्वात वरिष्ठ नेता फुआद शुकरला ठार केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जुलैला इराणवर हल्ला झाला आणि हमासचा प्रमुख इस्माइल हनियाही मारला गेला. आता हिजबुल्लाच्या नेतृत्वात एकही ज्येष्ठ नेता उरलेला नाही. त्याच वेळी, गाझामध्ये उपस्थित असलेल्या हमासच्या नेतृत्वात फक्त याह्या सिनवार जिवंत आहे. विशेष पेजर स्फोटानंतर नसराल्लाह कधीही समोर न येणारा समोर आला होता. यावेळी बोलताना त्याने मी जिवंत राहिलो, तर अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरून इस्त्रायल हल्ला करणार याची जाणीव नसराल्लाहला झाली होती, असे बोलले जात आहे.
नसराल्लाहची मुलगी जैनबच्या मृत्यूचा दावा
नसराल्लाह व्यतिरिक्त, इस्रायली मीडिया हाऊस चॅनल 12 ने देखील त्यांची मुलगी जैनबच्या मृत्यूचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलने हल्ला केलेल्या कमांड सेंटरच्या ढिगाऱ्यात हिजबुल्ला प्रमुखाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. ते म्हणाले की लेबनीज अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. बेरूतसह लेबनॉनमधील अनेक भागांवर इस्रायली सैन्याने क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्त्रायलने बेरूतच्या दहियाह शहरात राहणाऱ्या लोकांना तातडीने हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला करण्यासाठी या ठिकाणांचा वापर करत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा इस्रायलने हिजबुल्लाच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रात (UN) भाषणानंतर सुमारे एक तासानंतर हा हल्ला झाला.
खामेनी यांनी इराणमध्ये तातडीची बैठक बोलावली
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, बेरूतवर इस्रायली हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी इस्त्रायली हल्ल्याचा निषेध केला आणि हा युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले. खामेनी यांचे सल्लागार अली लारिजानी म्हणाले की, इस्रायल मर्यादा ओलांडत आहे. माणसे मारून तोडगा निघणार नाही. त्यांची जागा इतर घेतील. इस्रायलच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी लोक अधिक मजबूतपणे एकत्र येतील, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या