Iran Israel War: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष वाढला आहे. इराणकडून इस्त्रायलमधील सोरोका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. आता इस्त्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी खुली धमकी दिली आहे. इस्त्रायलनं हा हल्ला युद्ध गुन्हा असल्याचा दावा केला. या हल्ल्याला इराणचे खामेनी जबाबदार असल्याचं म्हटलं. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री कोट्ज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संरक्षणमंत्री कोट्ज म्हणाले, इराणचा हुकुमशाह एका बंकरमध्ये लपला आहे. त्यानं आमच्या रुग्णालयांवर आणि रहिवासी ठिकाणांवर हल्ला केला आहे. सर्वात खराब युद्ध गुन्हा आहे. खामेनी यांना याची शिक्षा भोगावी लागणार आहे. या गुन्ह्यासाठी ते पूर्णपणे जबाबदार आहेत. कोट्ज म्हणाले की पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आयडीएफला तेहरानमध्ये हल्ले तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेतन्याहू यांचा इराणला इशारा
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनी यांना इशारा दिला आहे. इराणनं केलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्याचं ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. इराणच्या दहशतवादी हुकुमशाह खामेनी याच्या सैनिकांनी सरोका रुग्णालयाला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं आहे. आता इराणला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल.
इस्त्रायलच्या बाजूनं अमेरिका असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेनं इस्त्रायल- इराण युद्धात लष्करी हस्तक्षेप करु नये असा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. एएफपीच्या रिपोर्टनुसार रशियाचे विदेश मंत्री सर्गेई रयाबकोव यांनी म्हटलं की अमरिकेनं इराण विरुद्ध त्यांचं सैन्य पाठवलं तर स्थिती बिघडू शकते.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाबाबत रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे विदेश नीती सल्लागार यूरी उशाकोव यांनी पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांच्यात चर्चा झाली. इराणवरील इस्त्रायलच्या हल्ल्याबाबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी इस्त्रायलच्या कारवाईचा निषेध केला. संयुक्त राष्ट्र चार्टरचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं.
110 भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले
इराणमधील 110 भारतीय विद्यार्थी आपल्या देशात परतले आहेत. जम्मू काश्मीरच्या 90 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. देशात परतल्यानंतर भारत सरकार, इराण आणि आर्मेनियामधील भारतीय उच्चायुक्तांना धन्यवाद दिले. ऑपरेशन सिंधूद्वारे इराणमधूल यशस्वीपणे 110 विद्यार्थ्यांना परत आणलं गेलं. भारतीय नागरिकांना घेऊन पहिलं विमान नवी दिल्लीत पोहोचलं. इंडिगो 6 ई 9487 द्वारे त्यांना इराणमधून दिल्लीत आणलं गेलं. केंद्रीय विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी भारतीय नागरिकांचं स्वागत केलं. इराणच्या उर्मिया मेडिकल विद्यापीठातून 110 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर उतरलं.