Iran-Israel Conflict: इस्रायलने इराणमधील अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. काही तासांपूर्वी इस्रायली आर्मीने (आयडीएफ) अरक आणि खोंडूब शहरांतील लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. अरकमध्ये एक हेवी वॉटर रिअॅक्टर आहे. ही सुविधा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच अरकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तयार केली जातात. प्रत्युत्तरादाखल इराणने तेल अवीव, बेअरशेबा, रमत गान आणि होलोन या चार इस्रायली शहरांवर 30 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायली मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली संरक्षण यंत्रणा 7 क्षेपणास्त्रे रोखण्यात अपयशी ठरली. यामध्ये 176 लोक जखमी झाले आहेत. 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की इराण जाणूनबुजून इस्रायली नागरिक आणि रुग्णालयांना लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांचा बदला इस्रायल घेईल. इराण आणि इस्रायलमधील युद्ध सातव्या दिवशी पोहोचले आहे. आतापर्यंत 24 इस्रायली मारले गेले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने असा दावा केला आहे की इराणमध्ये मृतांची संख्या आता 639 वर पोहोचली आहे आणि 1329 लोक जखमी झाले आहेत.
रशियाने अमेरिकेला दिला थेट इशारा
दरम्यान, या दोन्ही देशांच्या युद्धात आता अमेरिका सुद्धा एन्ट्री करण्याची शक्यता आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुतोवाच केले आहेत. मात्र, आता या सहभागावरून रशियाने थेट इशारा दिला आहे. जर अमेरिकेने हस्तक्षेप केला तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल इशारा दिला आहे. रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सनुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की जर अमेरिकेने इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षात हस्तक्षेप केला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि तणाव धोकादायक पातळीवर पोहोचू शकतो.
हिजबुल्लाहने म्हटले, खमेनींना धमकी देणे कोट्यवधी मुस्लिमांचा अपमान
हिजबुल्लाहने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांना जीवे मारण्याची धमकी देणे हे कोट्यवधी मुस्लिमांचा आणि खमेनींवर विश्वास ठेवणाऱ्यांचा अपमान आहे असे हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे. या धमक्यांनंतर, संघटनेने म्हटले आहे की ते आता खमेनींच्या बाजूने अधिक ठामपणे उभे आहे. तथापि, इस्रायलने इराणमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यापासून, हिजबुल्लाहने स्वतः या लढाईत भाग घेतलेला नाही. हिजबुल्लाहने इस्रायली हल्ल्यावर टीका केली होती, परंतु लेबनीज सरकारला माहिती न देता ते संघर्षात उतरणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
इराणच्या हल्ल्यात 176 जण जखमी
इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 176 जण जखमी झाले आहेत. इराणने म्हटले आहे की, इस्रायली गुप्तचर मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले आहे इराणी वृत्तसंस्था आयआरएनएने म्हटले आहे की सकाळच्या बॉम्बस्फोटात इराणचा उद्देश आयडीएफ गुप्तचर मुख्यालय आणि सोरोका रुग्णालयाजवळील तळाला लक्ष्य करणे होता.
इस्रायलच्या रमत गानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 जण जखमी
गुरुवारी सकाळी इराणने राजधानी तेल अवीवजवळील रमत गान शहरावर हल्ला केला. यामध्ये 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रमत गान राजधानी तेल अवीवपासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. येथील लोकसंख्या 1.75 लाखांहून अधिक आहे. इस्रायलचे डायमंड एक्सचेंज येथे आहे. ते जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या बाजारपेठांपैकी एक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या