Israel Palestine Conflict : लेबनॉनच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात (Israel Attack) हिजबुल्लाच्या (Hezbollah) स्पेशल कमांडो युनिट राडवान फोर्सचा एक वरिष्ठ कमांडर मारला गेला असल्याचे वृत्त आहे. लेबनॉनच्या सुरक्षा एजन्सीशी संबंधित सूत्रांनी मृत कमांडरची ओळख रडवान फोर्सच्या युनिटचे उपप्रमुख विसाम अल ताविल म्हणून केली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मजदाम सेल्म या लेबनीज गावावरील हल्ल्यादरम्यान त्यांची कार अडथळ्यावर कोसळल्याने आणखी एक हिजबुल्लाहचा सैनिक ठार झाला. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इस्रायलचा हल्ला अतिशय भीषण होता. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर दोघांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 


इस्रायलने हिजबुल्लाहच्या 130 सैनिकांना ठार केले


7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या हद्दीत हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर लष्करी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 24 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये सक्रिय असलेला हिजबुल्लाह सुरुवातीपासून हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर गोळीबार करत आहे. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात अनेक इस्रायली सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे आता इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवरही प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 130 हून अधिक हिजबुल्लाह सैनिक मारले गेले आहेत.


हिजबुल्लाहने इस्रायलला धमकी दिली आहे


हिजबुल्लाचे महासचिव सय्यद हसन नसराल्लाह यांनी गेल्या आठवड्यात दोन वेळेस टीव्हीवरून केलेल्या भाषणात इस्रायलने लेबनॉनवर संपूर्ण युद्ध सुरू न करण्याची धमकी दिली होती. नसराल्लाह म्हणाले, "जो कोणी आमच्याशी युद्धाचा विचार करेल - एका शब्दात, त्याला पश्चात्ताप होईल, असा इशारा त्यांनी दिला.


हिजबुल्लाकडे शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत इस्रायलने हिजबुल्लाशी थेट मुकाबला केल्यास हमासपेक्षाही जास्त नुकसान होईल. त्याच वेळी, लेबनीजच्या भूमीवर संपूर्ण हल्ल्यात, इस्रायलला त्या देशाच्या सैन्याशीदेखील दोन हात करावे लागणार आहे. 


इस्रायलचा एसयुव्हीवर हल्ला


इस्रायलने हा हल्ला एका एसयूव्हीवर केला, ज्यात विसाम अल ताविल मारला गेला. हिजबुल्लाच्या म्हणण्यानुसार, ताविल हा त्याच्या गुप्तचर दलाचा कमांडर होता, जो सीमा भागात काम करतो. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लढाईदरम्यान मारल्या गेलेल्यांमध्ये तो सिनियर रँकचा अधिकारी असल्याचे सांगितले जाते. 


दरम्यान, इस्रायलने म्हटले आहे की त्यांनी उत्तर गाझामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमुख ऑपरेशन्स पूर्ण केल्या आहेत. त्यांनी मध्यवर्ती क्षेत्र आणि दक्षिणेकडील खान युनिस शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. ही लढाई अनेक महिने सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इस्रायलचे उद्दिष्ट हमासला पूर्णपणे नष्ट करण्याचे आहे आणि 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यानंतर ओलीस असलेल्यांची सुखरुप सुटका करायची असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले.