Israel Palestine Conflict Updates : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्धाचा आज, 11 नोव्हेंबरला 35 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबरला या युद्धाला सुरुवात झाली. महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धामुळे हजारो जणांनी प्राण गमावले आहेत. युद्धात इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृतांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला आहे. गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले (Israel Gaza Attack) काही केल्या थांबत नाही आहेत. शुक्रवारी, 10 नोव्हेंबरला गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक रुग्णालयांच्या बाहेरही स्फोटांचा आवाज ऐकू आला.


गाझामध्ये दररोज 4 तासांची शस्त्रसंधी


दरम्यान, इस्रायलने म्हटले आहे की, उत्तर गाझामधील त्यांच्या ग्राउंड ऑपरेशन्सवर दररोज चार तासांचा युद्धविराम लागू करण्यात येईल, यामुळे येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर जाण्याची संधी मिळेल. या युद्धामुळे जगभरात इस्रायलविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. युद्ध थांबवण्यासाठी त्याच्यावर सतत दबाव टाकला जात आहे. पण, पॅलेस्टिनी संघटना हमासचा अंत केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं इस्रायलने आधीच स्पष्ट केलं आहे.


गाझातील रुग्णालयांना इस्रायली सैन्याचा घेराव


गाझातील 3 रुग्णालयांना इस्रायली सैन्यानं घेराव घातला आहे. गाझामधील अल-शिफा, अल-कुड्स, अल-रंतिसी आणि इंडोनेशियन रुग्णालये यासारख्या प्रमुख आरोग्य सुविधांच्या बाहेर इस्रायली सैन्याचे रणगाडे दिसले. हॉस्पिटलच्या जवळ आणि आतही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. इस्रायलने दावा केला आहे की, हमासच्या हॉस्पिटलखाली बोगदे आहेत, जे हमासच्या कारवायांचे तळ आहेत. गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात मारल्या जात असलेल्या पॅलेस्टिनींवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायलला धारेवर धरलं आहे. आतापर्यंत अनेक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. इस्त्रायलला अमेरिकेने अशाप्रकारे चपराक बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.


हमासचा खात्मा झाल्यावर गाझाबाबत इस्रायलची योजना काय?


इस्रायल-हमास युद्धादरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इस्रायली लष्कर सध्या गाझामध्ये घुसून हमासविरोधात कारवाई करत आहे. इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये हमासला चारही बाजूंनी घेरलं आहे. अशा स्थितीत गाझामधून हमासचा संपूर्ण खात्मा झाल्यानंतर गाझाबाबत इस्रायलची योजना पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केली आहे. नेतन्याहू म्हणाले की "आम्हाला गाझावर राज्य करायचं नाही. इस्रायली सैन्य गाझामध्ये चांगली कामगिरी करत आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू