Israel-Hamas War : हमास आणि इस्रायली यांच्यात युद्ध सुरुच आहे. या युद्धात अनेक लोक जखमी झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.  हमासेने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला आणि या दोन्हींमध्ये युद्धाला सुरुवात झाली. आज, बुधवारी या युद्धाचा पाचवा दिवस आहे. मंगळवारी रात्री समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक तसेच सैनिकांचा समावेश आहे.


हमास-इस्रायल संघर्ष सुरुच


दरम्यान, जगभरातील देश सध्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुढे आले असून त्यांनी इस्रायलच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला शस्त्र सामग्री पुरवण्याची घोषणा केली आहे.


ही फक्त सुरूवात : इस्रायलचे पंतप्रधान


हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलवर हल्ले करून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. हमासने इस्रायलवर हवेतून आणि समुद्रातून रॉकेट हल्ले केला, तसेच इस्रायलमध्ये घुसून नागरिकांवर गोळीबारही केला. त्यानंतर इस्रायलमध्ये युद्ध घोषित करण्यात आलं. इस्रायलकडूनही हमासच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. सोमवारी, 9 ऑक्टोबर रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की, ही युद्धाची फक्त सुरूवात असून हमासला युद्धाचे परिणाम भोगावे लागतील. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यानंतर इस्रायली लष्कराने गाझापट्टी रॉकेट डागले.


युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू


एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनींसह 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी, 10 ऑक्टोबरला हमासने इस्रायलच्या अश्कलोन शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. दुसरीकडे इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्बचा वर्षाव करत आहेत. या संघर्षात दोन्हींकडील स्थानिक नागरिकांचेही हाल होत असल्याचे समोर आलं आहे.


दोन्ही बाजूंचे 4000 हून अधिक लोक जखमी


पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, युद्धात दोन्ही बाजूंचे 4000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि भारतात नियुक्त इस्रायलचे कॉन्सुल जनरल टॅमी बेन-हैम यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.