Israel Palestine Cobflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Hamas War) यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. आज 22 व्या दिवशीही या युद्धाची धग कमी झालेली नाही. हमासने अनेक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. बंदी बनवलेल्या इस्रायलींची मुक्तता करण्यासाठी हमास तयार झालं आहे, पण त्यासाठी हमासने अट ठेवली आहे. इस्रायलने त्या अटीची पूर्तता केली तर, हमास बंदी बनवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करेल. 


हमास ओलिस ठेवलेल्या इस्रायलींना सोडण्यास तयार, पण...


इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, हमास ओलिस ठेवलेल्या सर्व नागरिकांची सुटका करण्यासाठी तयार आहे, मात्र सर्वप्रथम इस्रायलमध्ये कैदेत असलेल्या 6000 पॅलेस्टिनींची सुटका करावी. संयुक्त राष्ट्रात बोलताना इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान म्हणाले की, इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या 6,000 पॅलेस्टिनींना आधी सोडण्यात यावे, या अटीवर हमास इस्रायली ओलिसांची सुटका करण्यास तयार आहे.7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने 200 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे.


इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिकेला इशारा 


इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला इशारा देत म्हटलं आहे की, जर इस्रायलने गाझा पट्टीत रॉकेट हल्ले थांबवले नाहीत तर अमेरिकेलाही याची धग सहन करावी लागेल. अमेरिकेला इशारा देताना इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अब्दुल्लायान यांनी म्हटलं की, मी अमेरिकन राजकारण्यांना स्पष्टपणे सांगतो की, आम्ही युद्धाच्या बाजूने नाही, पण गाझामध्ये नरसंहार सुरूच राहिला तर, अमेरिका या आगीतून वाचू शकणार नाही. 6,000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे. इराण कतार आणि तुर्कस्तानसोबत महत्त्वाच्या मानवतावादी प्रयत्नांमध्ये आपली भूमिका बजावण्यास तयार आहे. 


गाझामध्ये मध्यरात्री जोरदार बॉम्बहल्ला


इस्रायली संरक्षण दल (IDF) आणि हवाई दलाने गाझा पट्टीवर हल्ले तीव्र केले आहेत. गाझामध्ये शुक्रवारी मध्यरात्री जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पांढऱ्या फॉस्फरस बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. गाझामध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याचा दावा हमासने केला आहे. यावरून इस्रायलचा गाझावरील जमिनीवरील हल्ला पुढील टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


इस्रायलने गाझामधील स्थानिक भागात गोळीबार तीव्र केला आहे. इस्रायली सैन्याला गाझामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हमास सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गाझामधील निवासी भागांवर इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे दळणवळण सेवाही विस्कळीत झाल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिला आहे.