इस्लामाबाद : व्हॅलेंटाईन डे आणि सोशल मीडियावर त्याबाबत मेसेज शेअर करण्यासाठी पाकिस्तानच्या कोर्टाने बंदी घातली आहे. व्हॅलेंटाईन डे मुस्लीमविरोधी असल्याची याचिका इस्लामाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला.

अब्दुल वहिद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती. व्हॅलेंटाईन डे हा मुस्लीम परंपरेचा भाग नाही. त्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या त्याच्या प्रचार-प्रसारावरही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

कोर्टाने ही याचिका स्वीकारत तातडीने निकाली काढली आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण (पेमरा) आणि इस्लामाबादच्या मुख्य आयुक्तांना कोर्टाने निर्णयाच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डेवरुन दरवर्षीच वाद उद्भवतात. मात्र व्हॅलेंटाईन डेवर कोर्टाने बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करु नये, याचा देशाच्या संस्कृतीचा काहीही संबंध नाही, असं राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी गेल्यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला म्हटलं होतं.