Mojtaba Khamenei: एकीकडे इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यात युद्ध संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असतानाच, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, खामेनी यांनी अद्याप एकदाही जनतेसमोर येऊन संवाद साधलेला नाही, ना त्यांचा कोणताही ऑडिओ किंवा व्हिडिओ संदेश समोर आला आहे.

Continues below advertisement

Mojtaba Khamenei: हवाई हल्ल्यात जखमी झाल्याची चर्चा

अमेरिकन आणि इराणी सूत्रांच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनातून गायब आहेत. जरी इराणच्या रस्त्यांवर त्यांचे मोठे पोस्टर्स लावले जात असले आणि सोशल मीडियावरून संदेश पोस्ट केले जात असले, तरी हे सर्व AI द्वारे तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Mojtaba Khamenei: सत्तासंघर्ष आणि कट्टरपंथीयांचा विरोध

खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणच्या अंतर्गत राजकारणात दोन गट पडले आहेत. येल युनिव्हर्सिटीचे इतिहासकार अरशद अजीजी यांच्या मते, मोजतबा यांचे समर्थक या शांतता चर्चेवर नाराज आहेत. नेत्याच्या अनुपस्थितीत अधिकारी अमेरिकेला अवाजवी सवलती देत असल्याची भीती त्यांना वाटत आहे. यामुळे कट्टरपंथी गट आता उदारवादी नेते आणि संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांना लक्ष्य करत आहेत.

Continues below advertisement

Mojtaba Khamenei: सरकारचा दावा, 'सुप्रीम लीडर' सुरक्षित!

वाढता संशय पाहून इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी मौन सोडले आहे. "मी नुकतीच मोजतबा खामेनी यांच्याशी अडीच तास चर्चा केली, ते सुरक्षित असून देशाचे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत," असा दावा त्यांनी केला. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, मोजतबा हे इस्रायलच्या 'हिट लिस्ट'वर अव्वल स्थानी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

Mojtaba Khamenei: पाठीच्या कण्याला दुखापत

शुक्रवारी रात्री एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने प्रथमच मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली. हवाई हल्ल्यात त्यांच्या पाठीच्या कण्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. "शत्रू त्यांच्या आवाजाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच सध्या कोणताही व्हिडिओ जारी केला जात नाही," असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.

Iran vs US Conflict: इराणच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

मोजतबा खामेनी यांच्या 'X' अकाऊंटवरून सूडाच्या भाषा केल्या जात असल्या तरी, सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत कोणतेही ठोस निर्देश मिळालेले नाहीत. मध्य-पूर्व संस्थेचे तज्ज्ञ एलेक्स वतनका यांच्या मते, इराणला सध्या अशा नेत्याची गरज आहे जो समोर येऊन कणखर निर्णय घेऊ शकेल. जोपर्यंत मोजतबा स्वतः समोर येत नाहीत, तोपर्यंत इराणचे भवितव्य आणि शांतता चर्चेची विश्वासार्हता टांगणीला लागलेली असेल.

आणखी वाचा

सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर