मुंबई : इस्त्रायले पंतप्रधान नेतान्याहू म्हणजे 21 व्या शतकातील हिटलर असल्याचं वक्तव्य इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केलं. इस्त्रायलने इराणवर हल्ला केला तर पुन्हा त्या देशावर विनाशकारी हल्ला केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. आखाती देशांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत मदत करू शकतो असं मोठं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. 


पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग दाटून आल्याचं दिसतंय. लेबनॉनवर हल्ला करून इस्त्रायलने हिजबुल्लाह संघटनेच्या प्रमुखाला ठार मारलं. त्यानंतर इराणने त्याला प्रत्युत्तर देत 180 हून जास्त मिसाईल्सचा मारा केला. आता इस्त्रायलही त्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालं आहे. 


इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही म्हणाले की, जर इस्रायलने इराणवर आणि त्याचे  हितसंबंध असलेल्या गोष्टींवर हल्ले करणे टाळले नाही तर इराण पुन्हा इस्रायलवर हल्ला करेल. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे 21 व्या शतकातील हिटलर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच इराण आपले हित आणि राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. 


हिजबुल्लाहच्या प्रमुखाला ठार केलं


गेल्या आठवड्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहची इस्त्रायलने हत्या केली होती. त्यानंतर इराणने त्याचा बदला घेण्याची शपथ घेतली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इराणच्या राजदूताने म्हटले आहे की, 'इस्रायलने इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध होणारे उल्लंघन थांबवले नाही तर त्याला पुन्हा पुन्हा अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. केवळ आखाती देशांमध्येत नाही तर जगभरातील लोक पश्चिम आशियातील इस्रायलची भूमिका पाहत आहेत. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये होत असलेला रक्तपात सर्वजण पाहत आहेत. लोक संतप्त आहेत आणि इस्रायलने सर्व मानवाधिकार करारांचे उल्लंघन केले आहे. 


इस्त्रायलला हिंसा थांबवण्यास भारताने सांगावं


इराणचे भारतातील राजदूत पुढे म्हणाले की, इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला जगभरातील अनेक लोकांचा पाठिंबा असेल. इस्रायलशी भारताचे संबंध चांगले असल्याने पश्चिम आशियात भारताच्या भूमिकेला मोठं महत्व आहे. भारत हा या क्षेत्रातील महत्त्वाचा खेळाडू आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे हे युद्धाचे युग नाही. इराणमध्येही आम्ही यावर विश्वास ठेवतो. पण एका देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले तर तो देश दुसरे काय करू शकतो? अशावेळी इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांशी चांगलं संबंध असलेल्या भारताने इस्त्रायलला या भागातील हिंसा थांबवण्यास सांगावं. 


इराणने मोठी चूक केली, नेत्यानाहूचा इशारा


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचा क्षेपणास्त्र हल्ला हा अयशस्वी प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. आयर्न डोमसह इस्त्रायली संरक्षण यंत्रणेने 180 हून अधिक क्षेपणास्त्रांना जमिनीवर पडण्यापासून रोखल्याचा दावा त्यांनी केला. केवळ काही क्षेपणास्त्रे जमिनीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली आहेत. इराणने आज मोठी चूक केली असून त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल, असे नेतान्याहू म्हणाले. 


ही बातमी वाचा :